-
CENTRES
Progammes & Centres
Location
असे म्हटले जाते की, ‘भुकेला स्त्रीचा चेहरा असतो’, याचे कारण असे की, सुमारे दोन-तृतीयांश देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना अन्न असुरक्षिततेचा सामना अधिक करावा लागतो.
गर्भारपणात अनुकूल परिणाम साध्य करण्यात तसेच मातेचे, नवजात अर्भकाचे आणि बालकांचे आरोग्य राखण्यात मातेचे पोषण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. माता कुपोषित असल्याने सुमारे २० टक्के बालकांची वाढ खुंटत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. कमी शिक्षण आणि महिलांची वाईट सामाजिक-आर्थिक स्थिती या दोन्ही घटकांसह निकृष्ट पोषण आहाराचा स्वत:ची योग्य काळजी घेण्यासंबंधातील वर्तन पद्धतींवर विपरित परिणाम होतो, ज्याचा गर्भवती स्त्रियांच्या उंची वजन निर्देशांकावर (बॉडी मास इंडेक्स) तसेच गर्भाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि मुलांची वाढ खुंटण्यासही ही बाब कारणीभूत ठरते. बालकांचे पोषण उत्तम होण्याकरता मातेचे पोषण नीट होणे आवश्यक असते, याचे महत्त्व आता चांगलेच लक्षात आले आहे आणि नवजात अर्भकाचे पहिल्या हजार दिवसांतील कुपोषण रोखण्यासाठी योजल्या जाणाऱ्या उपक्रमांत मातेचे पोषण हा एक अविभाज्य भाग आहे.
पौगंडावस्थेतील आणि गर्भधारणापूर्व काळात महिलांचे निकृष्ट पोषण झाल्याने, कुपोषित मातेला गर्भारपणी- गर्भाच्या वाढीसंदर्भात अडथळे निर्माण होऊ शकतात. गर्भारपणातील अपुऱ्या पोषणामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्माला येऊ शकते किंवा जन्माच्या वेळेस बाळाचे वजन खूपच कमी असते. १५ ते ४९ वयाच्या स्त्रियांच्या पोषण स्थितीत सुधारणा झाली (उंची-वजन निर्देशांक) तर जन्माला येणारे बाळ पुरेशा वजनाचे असते, हा सहसंबंध अनेक पुराव्यांतून सूचित झाला आहे. त्याशिवाय, असे नोंदवले गेले आहे की, ज्या महिलेची बालपणी कुपोषणामुळे वाढ खुंटलेली असते, त्या मोठेपणीही अविकसितच राहतात आणि त्यांची संततीही अविकसित राहण्याची मोठी शक्यता असते.
मातेच्या कुपोषणात पोषण कमी मिळणे, वजन वाढणे तसेच लोह, फोलेट, जीवनसत्त्वे आणि हिमोग्लोबीनची कमतरता या बाबींचा समावेश होतो, त्याचा गर्भधारणेवर विपरित परिणाम होतो. पहिल्या आकृतीत दर्शवल्यानुसार, महिलांचे कुपोषण २००८-२००९ साली ३५.५ टक्के होते, त्यात घसरण होऊन ते २०१९-२०२१ साली ते १८.७ टक्क्यांपर्यंत आले आहे, मात्र या काळात वजन वाढण्याचे/ स्थूलतेचे प्रमाण दुप्पट झाले आणि लोह, फोलेट, जीवनसत्त्वे, हिमोग्लोबीन यांच्या कमतरतेचे प्रमाण जवळपास ‘जैसे थे’ राहिले.
खाण्याच्या सवयींत झालेल्या बदलांमुळे आणि बैठ्या, निष्क्रिय जीवनशैलीत वाढ झाल्याने ऊर्जा कमी प्रमाणात खर्च कमी होते. यामुळे भारतातील महिलांचे वजन वाढण्याचा दर वाढला आहे. आरोग्यास अपायकारक असलेले पदार्थ आकर्षक वेष्टनांत आणि कमी किमतीत सुलभरीत्या उपलब्ध असतात. प्रक्रिया केलेले हे पदार्थ चरबीयुक्त असतात आणि त्यात साखरेचे प्रमाण अधिक असते. आसपास रेलचेल असलेले असे खाद्यपदार्थ स्त्रिया खातात, ज्यामुळे दैनंदिन कामासाठी किंवा हालचालींसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जा त्यांना यांतून मिळते. कुपोषणाच्या आणि अतिपोषणाच्या समस्येच्या व्यतिरिक्त, पुनरुत्पादक वयात स्त्रियांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते. माहिती अहवाल सूचित करतो की, स्त्रीचा उंची-वजन निर्देशांक सामान्य, कमी किंवा उच्च असला तरीही स्त्रियांचा आहार अपुरा आहे आणि त्यांच्या आहारात लोह, फोलेट, जीवनसत्त्वे बी१२ यांसारख्या मुख्य सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळून येते. पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, लोह आणि फोलिक अॅसिडच्या कमतरतेचे प्रमाण ५७ टक्के महिलांमध्ये आढळते. १५ ते १९ या किशोरवयीन वयोगटातील मुलींमध्ये २०१५-१६ साली अशा कमतरतेचे प्रमाण ५४.१ टक्के होते, २०१९-२१ दरम्यान या कमतरतेत ५९.१ टक्के इतकी चिंताजनक वाढ झाली आहे. २०२१ साली करण्यात आलेल्या अभ्यासात, गरिबी, अन्नाची अनुपलब्धता, जागरूकतेचा अभाव, विशिष्ट अन्न निषिद्ध असणे आणि लिंगभेद यांमुळे गर्भवती महिलांच्या आहाराचे प्रमाण निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे.
‘युनिसेफ’च्या अलीकडच्या अहवालात नमूद केल्यानुसार, “महिलांमधील कुपोषणाचे मूळ व्यक्तिगत, घरगुती, समुदाय आणि सामाजिक स्तरावर तिची काळजी घेण्याच्या पद्धतींतील अभावामध्ये आहे”. सर्व वयोगटांतील सर्व प्रकारच्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी आणि त्याचे पिढ्यानपिढ्या सुरू राहणारे चक्र खंडित करण्यासाठी महिलांच्या पोषणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महिलांमधील कुपोषण हा गरिबीचा परिणाम आहे आणि सामाजिक-सांस्कृतिक नियमांमुळे आणि असमान प्रथांद्वारे यांत भर पडते; ज्यामुळे स्वत:च्या पोषणासंदर्भात निर्णय घेण्याच्या महिलांच्या क्षमतेवर मर्यादा येते. खाण्याच्या बाबतीत महिलांकडे दुर्लक्ष केले जाते, अनेकदा त्या कमी खातात आणि सर्व कुटुंबाचे जेवण झाले की सर्वात शेवटी त्या जेवतात. असे लिंगसापेक्ष नियम आहेत, ज्यामुळे घरातील स्त्रियांच्या वाट्याला कमी अन्न येते आणि त्या कमी जेवतात. ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने उत्तर प्रदेशात केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, सर्वेक्षण केलेल्या महिलांपैकी एक पंचमांश महिला कमी जेवतात किंवा अन्न खरेदी करण्यातील आर्थिक अडचणींमुळे महिला कमी खातात. देशाच्या ग्रामीण भागातील महिलांसंदर्भात करण्यात आलेल्या आणखी एका अभ्यासातून, महिलांच्या आहारातील अंतर आणि त्या घेत असलेल्या आहारात विविधतेचा असलेला अभाव सूचित झाला आहे. राजस्थानमधील आदिवासी समुदायांमधील एका प्रकल्पातंर्गत केलेल्या अभ्यासात- घरगुती अन्नाचा वापर आणि महिलांची स्वायत्तता या मुद्द्यांकडे लक्ष पुरवून महिलांच्या पोषणात सुधारणा घडून आल्याचे दिसून आले आहे.
जेवणाच्या बाबतीत महिलांकडे दुर्लक्ष केले जाते, अनेकदा त्या कमी खातात आणि सर्व कुटुंबाचे जेवण झाले की सर्वात शेवटी त्या जेवतात. असे लिंगसापेक्ष नियम आहेत, ज्यामुळे घरातील स्त्रियांच्या वाट्याला कमी अन्न येते आणि त्या कमी जेवतात.
कोविड साथीच्या काळात महिलांची पोषण सुरक्षा आणि अन्न सेवन हा प्रश्न अधिक बिकट बनला. या संदर्भात ग्रामीण भारतात जे चित्र दिसून येते, त्यात कोविड साथीच्या काळात बसलेला आर्थिक फटका आणि पौष्टिक पदार्थांची अनुपलब्धता यांमुळे अन्नावर केल्या जाणाऱ्या खर्चात आणि महिलांच्या आहारातील विविधतेत घसरण झालेली दिसून येते. ओडिशातील असुरक्षित गटांमधील अन्न सुरक्षेचे मूल्यांकन केले असता, कुटुंबप्रमुख महिला असलेल्या कुटुंबांच्या आहारात विविधतेचा अभाव दिसून येतो, तसेच आवश्यक तितक्या वेळा त्यांना खायला मिळत नसल्याचेही दिसून येते. कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांचे पुनरावलोकन केले असता, निम्न सामाजिक आर्थिक स्थितीतील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न असुरक्षितता दिसून येते. भारतीय आदिवासी महिलांमधील कुपोषणाच्या प्रादुर्भावामध्ये तीव्र लिंगसापेक्ष विषमता दिसून आली आहे.
पोषण अभियानाने याचे महत्त्व ओळखले असून त्यांनी संपूर्ण जीवनचक्रातील पोषणावर भर देण्यात आला आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० उपक्रमाच्या अलीकडेच जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बालवयातील कुपोषण कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘किशोरवयीन मुलींच्या पोषणाची काळजी’ या विषयाला अग्रस्थान देण्यात आले आहे. आहार आणि पोषणविषयक शिक्षणाव्यतिरिक्त, किशोरवयीन मुलींसाठी योजलेल्या योजनेचा उद्देश हा मुलींना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे हा आहे, तसेच उपलब्ध संसाधनांच्या माहितीच्या वापरासह स्वत:च्या आणि कुटुंबाची काळजी घेण्यासंबंधीचा निर्णय घेण्यास मुलींना सक्षम करण्याकरता, समाजाला एकत्रित करणे हाही आहे.
असे म्हटले जाते की, ‘भुकेला स्त्रीचा चेहरा असतो’, याचे कारण असे की, सुमारे दोन-तृतीयांश देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना अन्न असुरक्षिततेचा सामना अधिक करावा लागतो. खुंटलेली वाढ, कमी वजनामुळे येणारा अशक्तपणा आणि जन्माच्या वेळेस अपुरे वजन असे सर्व प्रकारचे कुपोषण संपवून जागतिक पोषण लक्ष्य साध्य करीत, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महिलांच्या पोषक आहारात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. सुधारित पोषण स्थितीसाठी, प्राधान्यक्रमाने घरातील- विशेषतः महिलांच्या आणि मुलांच्या अन्नाचे प्रमाण आणि पोषण स्तरात सुधारणा होणे आवश्यक आहे. मनुष्यबळाच्या भांडवल उभारणीत आणि भावी पिढ्यांचे आरोग्य सुधारण्यात महिलांचे सक्षमीकरण मदत करते.
हे भाष्य मूलत: न्यूज १८ येथे प्रकाशित झाले आहे.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr. Shoba Suri is a Senior Fellow with ORFs Health Initiative. Shoba is a nutritionist with experience in community and clinical research. She has worked on nutrition, ...
Read More +