हा लेख ‘युक्रेन क्रायसिस: कॉज अॅण्ड कोर्स ऑफ द कॉन्फ्लिक्ट’ मालिकेचा एक भाग आहे.
युक्रेनवर रशियाने केलेल्या अपयशी आक्रमणात तेथील निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले गेले आहे, त्यात स्त्री-पुरुष सर्वांचेच भयंकर नुकसान झाले आहे. गेल्या सोमवारी, युक्रेनमध्ये काळ्या कचऱ्याच्या पिशवीत गुंडाळलेले ४०० हून अधिक मृतदेह सापडले होते. मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडलेल्या या नागरिकांबाबत जगभरात शोक-संताप व्यक्त झाला. रशियन सैन्याच्या तावडीतून अलीकडेच पुन्हा ताबा मिळविलेल्या प्रदेशांमधील सामूहिक कबरींमध्ये हे मृतदेह दफन करण्यात आले होते. युक्रेनच्या नागरिकांसाठी युद्धाची ही भीषणता सुरूच आहे. युक्रेनमधील महिला तर एक वेगळ्या प्रकारचे युद्ध लढत आहेत, ज्यात त्यांना स्वतःचे, त्यांच्या कुटुंबांचे तसेच त्यांच्या समुदायांचे संरक्षण करावे लागत आहे.
रशियन गोळीबाराच्या आणि बॉम्बहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भूमिगत मेट्रो स्थानकांत जन्म देणाऱ्या महिलांची भयावह छायाचित्रे, व्हिडिओज तसेच बॉम्ब अथवा क्षेपणास्त्रांसारख्या स्फोटक शस्त्रांपासून लोकांना संरक्षित करण्यासाठीच्या बंद जागेतील आश्रयस्थानांमध्ये तात्काळ हलविलेल्या नवजात मुलांचे व्हिडिओज सोशल मीडियावर आधीच समोर आले आहेत. या व्यतिरिक्त, रशियन सैनिकांनी युक्रेनच्या महिलांवर आणि दहा वर्षांहून कमी वयाच्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा दावाही सोशल मीडियावर फिरत आहे. तरीही, युक्रेनमधील संघर्षाचा विशेषत: महिलांवर जितका मोठा परिणाम झाला आहे, त्याचे अद्याप पूर्णपणे दस्तावेजीकरण करण्यात आलेले नाही.
खोलवर रुजलेले लिंगसापेक्ष नियम आणि पितृसत्ताक संस्कृती यामुळे पारंपरिकपणे युक्रेनमधील महिलांना आरोग्य सेवा आणि न्याय मर्यादित मिळतो. याशिवाय, युक्रेन-रशिया संघर्षात महिलांविरूद्ध होत असलेल्या गुन्ह्यांची अधिकृत माहितीदेखील गहाळ आहे.
मात्र, उघड सत्य हे आहे की, युक्रेनवर रशियाने केलेल्या लष्करी आक्रमणादरम्यान, युक्रेनमधील महिलांनी उपलब्ध सेवांमधील प्रवेश गमावला आहे; कुटुंबाची काळजी घेण्याच्या अतिरिक्त जबाबदारीचे ओझे त्या पेलत आहेत; आणि लैंगिक शोषण व गैरवर्तन या बाबतीत त्या अधिक असुरक्षित बनल्या आहेत, ज्यान्वये, संघर्षाचे काही प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्तरदायित्व पेलण्याचे असमान ओझे जणू त्यांच्या खांद्यावर आहे.
सेवा उपलब्ध नाहीत
सुरुवातीस, खोलवर रुजलेले लिंगाधारित नियम आणि पितृसत्ताक संस्कृतीने पारंपरिकरीत्याच युक्रेनमधील महिलांचा आरोग्य सेवा आणि न्यायामधील प्रवेश मर्यादित केला होता. परंतु सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, त्यांची असमर्थता आणि सुरक्षित जागा शोधण्यातील क्षमता अधिकच खालावली आहे.
रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे- सामान्य संरक्षण संरचना आणि सहाय्यकारी व्यवस्था आता खंडित झाल्यामुळे- नियमित आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात आकुंचित झाल्या आहेत, ज्यामुळे लैंगिक आणि प्रसूतीसंदर्भातील काळजीसह अगदी मूलभूत आरोग्य सेवाही महिलांना उपलब्ध होण्यात अतिरिक्त अडथळे निर्माण झाले आहेत.
युक्रेनमधील महिलांपैकी सुमारे ७५ टक्के महिलांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची हिंसा अनुभवली आहे आणि तिघींपैकी एकीला शारीरिक लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे लागल्याची नोंद आहे.
पोट सावरणाऱ्या स्ट्रेचरवरील गर्भवती महिलेच्या मृत्यूची बातमी प्रसूतीपूर्व काळजीची गरज असलेल्या महिलांची असुरक्षा अधोरेखित करते आणि व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार, युक्रेनमध्ये पुढील तीन महिन्यांत सुमारे ८० हजार महिला बाळाला जन्म देतील, अशी शक्यता आहे.
मात्र, या गर्भवती महिला मातृत्वासंदर्भातील महत्त्वपूर्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहिल्यास, बाळंतपणाचा अनुभव त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो.
लैंगिक हिंसा आणि बलात्कार
युक्रेनमधील महिलांसह, ज्या महिला गेल्या आठ वर्षांपासून पूर्व युक्रेनमध्ये संघर्षाच्या छायेत जगत आहेत- त्यांना लिंगाधारित हिंसेची समस्या चांगलीच ठाऊक आहे. २०१९ मध्ये, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडद्वारे (युएनएफपीए) प्रकाशित केलेल्या अभ्यासातील आकडेवारीनुसार, सुमारे ७५ टक्के युक्रेनच्या महिलांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हिंसाचार अनुभवला आहे आणि तिघींपैकी एकीला शारीरिक लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे लागल्याची नोंद आहे.
संघर्षांमध्ये, लैंगिक हिंसाचार आणि बलात्कार हे शत्रूवर शक्ती प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नात युद्धाचे अस्त्र म्हणून वापरले जाते, हे लक्षात घेता, युक्रेनवर रशियाने केलेल्या लष्करी आक्रमणादरम्यान तेथील महिलांना लैंगिक आणि शारीरिक हिंसाचार, अत्याचार, बलात्कार आणि छळवणूक याचा मोठा धोका आहे.
युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेन्क यांनी तर याही पलीकडे जात दावा केला आहे की, रशियन सैन्याने महिलांवर बलात्कार केला आणि त्यांच्या शरीरावर स्वस्तिक आकाराच्या भाजल्याच्या खुणांचे ठसे मागे सोडले. मात्र, या विधानांची अद्याप पडताळणी केली गेलेली नाही, परंतु त्यात थोड्या प्रमाणात जरी सत्य असल्यास, ही छायाचित्रे रशियाने केलेल्या युद्ध-गुन्ह्यांचे प्रकरण तयार करण्यासाठी पुरावा म्हणून वापरली जाऊ शकतात.
युक्रेनमध्ये, महिलांना नेहमीच एकमात्र काळजीवाहक आणि प्रदाता या दृष्टिकोनातून पाहिले जाते. मुले, कुटुंब आणि वृद्ध व्यक्ती यांचे पालनपोषण करण्याची प्राथमिक जबाबदारी महिलांवर असते.
लिंगाधारित हिंसेसाठी स्त्रियांच्या वाढत्या असुरक्षिततेत आणखी एक घटक जोडला जातो, तो म्हणजे संघर्षामुळे इतर ठिकाणी विस्थापित होण्याकरता बालविवाह किंवा आत्यंतिक गरजेपोटी शरीरविक्रय करण्यासारख्या नकारात्मक पद्धतींचा अवलंब करण्यास भाग पडणे आणि याचा शेवट शोषणात आणि गैरवर्तनात होतो.
संगोपनाचे अतिरिक्त ओझे
याशिवाय, युक्रेनमध्ये प्रथेनुसार महिलांकडे एकमात्र काळजीवाहक आणि प्रदाता म्हणून पाहिले जाते. त्यांची मुले, कुटुंबे आणि घरातील वृद्ध व्यक्तींचे पालनपोषण करण्याची प्राथमिक जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, रशियाच्या आक्रमणादरम्यान, युक्रेन सरकारने, १८-४० वर्षे वयोगटातील पुरुषांनी देश सोडून न जाता, देशासाठी लढण्यासंदर्भात अलीकडेच आदेश जारी केला आहे. त्यामुळे, युक्रेनमधील महिलांना आता नवीन आणि तणावपूर्ण काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागत आहे.
उदाहरणार्थ, त्यांच्या पारंपरिक कुटुंबपद्धतीला तडा गेल्यामुळे, युक्रेनच्या महिलांच्या हाती कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी अल्प उत्पन्न शिल्लक राहिले आहे. आसरा मिळालेल्या देशांमध्ये पुनर्वसनासाठी स्त्रिया आणि मुलांना अल्प मदतीसह एकट्याने पळून जावे लागल्याने, स्थिती अधिक बिघडली आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम)च्या मते, एक कोटी व्यक्तींपैकी अर्ध्याहून अधिक महिला आणि मुले आहेत, ज्यांनी आक्रमणामुळे युक्रेनमधले आपले घर सोडून पळ काढला आहे.
हे वाढते कौटुंबिक ओझे पेलणे, महिलांच्या क्षमतेच्या पलीकडे असल्याने त्यांना चिंता, आघात आणि नैराश्य यांसह मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
निष्कर्ष
रशिया-युक्रेन युद्धाने अशा प्रकारे, पुरातन लैंगिक भूमिका सुस्पष्टपणे पक्क्या केल्या आहेत आणि काही प्रमाणात नव्या भूमिका निर्माण केल्या आहेत, ज्याचे परिणाम महिलांकरता विनाशकारी आहेत. मात्र, या सद्य समस्येचे दीर्घकालीन आणि शांततापूर्ण निराकरण सुनिश्चित करण्यासाठी, युक्रेनमधील परिस्थितीचे लिंगसापेक्ष विश्लेषण केवळ महत्वाचेच नाही तर ते तातडीने करणे आवश्यक आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.