Published on Jan 23, 2020 Commentaries 0 Hours ago

सध्या अस्तित्वात असलेल्या शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या उत्पादनांत सध्याच्या शिक्षणप्रणालीपासून विद्यार्थी दूर किंवा परीघावर राहिलेल्यांसाठी काहीही नाही.

शिक्षण आवाक्यात आणण्यासाठी तंत्रज्ञान

शालाबाह्य विद्यार्थ्यांची धोकादायक पातळीवर पोहोचलेली संख्या आणि युवकांसाठी कामाच्या संधींचा अभाव यामुळे जागतिक पातळीवर या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठीच्या प्रयत्नांना चालना दिली आहे. युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिक्सच्या (युनेस्को सांख्यिकी संस्थेच्या) २०१८ मधील अहवालानुसार जगात २६० दशलक्ष मुले आणि युवक शिक्षणापासून वंचित आहेत. उत्तम दर्जाचे शिक्षण त्यांच्या आवाक्याबाहेरील असल्याने यापैकी अनेक युवकांकडे साक्षरता (अक्षरओळख) आणि गणितासारखी (अंकओळख) मूलभूत कौशल्येही नाहीत, आणि त्यामुळे त्यांचा पूर्ण क्षमतेने होणारा विकास रोखला जात आहे.

व्यापक प्रमाणावर परिणाम साधू शकणा-या तंत्रज्ञानावर आधारित उपायांमध्ये वाढ होत असल्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक शिक्षणविषयक तंत्रज्ञान कंपन्यांनी विविध उत्पादनांचा विचार करून त्यांची निर्मिती केली आहे. तथापि, सध्या अस्तित्वात असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये आणि उत्पादनांत असे गृहित धरलेले असते की, त्यांचे वापरकर्ते शिक्षणासाठी प्रेरित झालेले असतात. सध्याच्या शिक्षणप्रणालीपासून विद्यार्थी दूर (किंवा परीघावर) राहिल्यामुळे शिक्षणाचे फायदे दृष्टीआड होतात आणि त्याने उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करण्यासाठीची प्रेरणा मिळणे अवघड बनते, ही बाब कायम विसरली जाते.

हीच बाब विचारात घेऊन सॉल्व्ह एज्युकेशनने यशस्वी संगणक खेळ विकासकांचा (गेम डेव्हलपर्सचा) अनुभव वापरून डॉन ऑफ सिव्हिलायझेशन नावाचे शैक्षणिक अँप विकसित केले आहे. मुलांमध्ये शिक्षणाची प्रेरणा रुजावी म्हणून त्याची रचना आकर्षक खेळाच्या स्वरूपात केली आहे. एकदा त्या प्रेरणेने मूळ धरले आणि ती वाढीस लागली की, मुले अधिक गहि-या आत्मिक प्रेरणेच्या (अंत:प्रेरणेच्या) वाटेवर मार्गक्रमण करू लागतात आणि आयुष्यभरासाठी शिकण्याची उर्मी अंगी बाणवते.

परिघाबाहेर राहिलेल्या मुलांच्या प्रभावी शिक्षणासाठी प्रेरणा हा महत्त्वाचा घटक असल्याने अभ्यासक्रम शिकवण्याची किंवा मुलांपर्यंत पोहोचवण्याची पद्धतही प्रत्यक्ष अभ्यासक्रमाइतकीच महत्त्वाची आहे. सॉल्व्ह एज्युकेशनच्या अभ्यासक्रमाचा गाभा पायाभूत दृष्टीकोनावर आधारलेला असून,त्याचे मर्म ‘डॉन ऑफ सिव्हिलायझेशन’ या गेम अँपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाते. विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्रपणे शिकण्याची वृत्ती बाणवली जावी, ते यशस्वी व्हावेत, शिकण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास बसावा या हेतूंनी त्याची रचना केली आहे.

अभ्यासक्रमात मुख्यत्वे अक्षरओळख आणि अंकओळख ही मूलभूत कौशल्ये शिकवली जातात, जी युवकांना २१व्या शतकातील ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत उत्कर्ष घडवण्याच्या दृष्टीने सबलीकरण करण्यास गरजेची आहेत. या युवकांना शिक्षण आणि रोजगार मिळवण्यात मदत करून त्यांनी समाजात कृतीशीलपणे सहभागी होण्याचा आणि आजीवन शिक्षणाचा पाया घातला जातो. या बाबी युवकांना डेटा (विदा) आणि अन्य माध्यमांनी जोडल्या गेलेल्या जगात आत्मविकास साधू शकणारे प्रौढ बनवण्यास मदत करतात.

काळजीपूर्वक विकसित केलेला अभ्यासक्रम आणि तो मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘डॉन ऑफ सिव्हिलायझेशन’ या गेमचा विकास करून सॉल्व्ह एज्युकेशन जगभरातील अनेक मुलांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणण्यात यशस्वी झाले आहे. त्यापैकी बहुतांश मुले इंडोनेशिया, भारत, म्यानमार, सिंगापूर आणि नायजेरिया आदी देशांतील आहेत. कँपस डायकोनिया मॉडर्न (केडीएम) यांसारख्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून हा गेम १३,००० लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.

केडीएम ही इंडोनेशियातील बेकासी येथील स्वयंसेवी संस्था असून तिने हजारो बेघर मुलांना संरक्षण आणि पर्यायी शिक्षण पुरवण्यास मदत केली आहे. केडीएमच्या मार्गदर्शनाखाली मुलांना हा गेम शिकण्यास सरासरी ३.२ तास लागले आणि त्यांनी अभ्यासक्रमात सरासरी १०.४ टक्के इतकी प्रगती केली.

वंचित मुलांना मदत करण्याचे सॉल्व्ह एज्युकेशनचे कार्य एवढ्यावरच थांबत नाही. डॉन ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या युवकांना सॉल्व्ह एज्युकेशनच्या नोकरीविषयक पोर्टलचीही मदत मिळते. शिक्षणात ठरावीक पातळी गाठल्यानंतर हे युवक सुरक्षितरीत्या रोजगार मिळवण्याच्या वातावरणात प्रवेश करू शकतात आणि त्यांच्या नव्याने आत्मसात केलेल्या कौशल्यांवर आधारित अर्धवेळ किंवा प्रकल्पावर आधारित रोजगार मिळवू शकतात.

शिक्षणाचे लोकशाहीकरण करणे आणि ते सर्वांच्या आवाक्यात आणणे हे सॉल्व्ह एज्युकेशनचे अंतिम ध्येय आहे. त्यांच्या इंटरनेटवर आधारित सुविधा सर्वांसाठी खुल्या केल्या जातील, जेणेकरून ‘डॉन ऑफ सिव्हिलायझेशन’ गेमचा ढाचा वापरून लोकांना त्यांचा स्वत:चा अभ्यासक्रम तयार करून वापरता येईल. याशिवाय गेमचा ढाचा असा तयार केला आहे की, त्यातून अनेक विषय शिकवता येतील. आमच्या प्रयत्नांचे अधिष्ठान हेच आहे की, प्रत्येकाला मोफत शिक्षण मिळाले पाहिजे आणि प्रत्येकजण दुस-याला शिक्षण घेण्यात मदत करू शकला पाहिजे. प्रत्येकजण विद्यार्थी आहे आणि शिक्षकही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.