-
CENTRES
Progammes & Centres
Location
भारतासाठी सर्वात मोठी समस्या आपले शेजारील देशच आहेत. त्यांच्यासोबतच्या राजनैतिक धोरणास आकार देण्यात आपल्याला अद्यापही यश मिळालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील परराष्ट्र धोरण हे प्रचंड ऊर्जा आणि परिश्रमाने भारलेले होते, परंतु ते धोरण तर्कशुद्ध आणि स्पष्ट नव्हते. नवी दिल्लीने अनेक दिशांना साद घालण्याचा प्रयत्न केला – आपल्या शेजारील राष्ट्रे, हिंदी महासागरातील आणि दक्षिण पॅसिफिक मधील बेटांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला, तसेच जगभर पसरलेल्या भारतीय वंशाच्या लोकांचा, प्रमुख शक्तींचा आणि गल्फमधील शेख समुदायाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या परराष्ट्र धोरणाने अपेक्षित ध्येय गाठले का, म्हणजेच, आपली सुरक्षा आणि समृद्धी वाढवण्यास परराष्ट्र धोरण यशस्वी ठरले का? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर आहे, नाही.
सरकारच्या या दुसऱ्या कार्यकाळात बिघडलेल्या संबंधांची दुरुस्ती हे ध्येय असल्याचे दिसून येते. बीजिंगला एकटे पाडण्याचे जे प्रयत्न चालले होते, त्यात अपयश आल्याने त्या योजनेतून दोन पावले पाठी येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पाकिस्तानच्या बाबतीत एका बाजूला विहीर तर दुसऱ्या बाजूला दरी अशा काहीशा परिस्थितीत अडकलेल्या भारताचे शेजारी राष्ट्रांसाठी असलेले परराष्ट्र धोरण पूर्वेकडील राष्ट्रांवर लक्ष केंद्रीत करणारे आखण्यात येत आहे. बिमस्टेक (BIMSTEC)गटातील नेत्यांना (बिमस्टेक गटातील देश – बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान) गेल्या महिन्यात झालेल्या पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभाचे आमंत्रण देण्यात आले होते. इथे एक गोष्ट अजून लक्षात घेण्यासारखी आहे की, २०१४ मध्ये सार्क (SAARC) मधील सहभागी देशांतील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
अमेरिकेच्या बाबतीत भारताने सावधगिरी बाळगली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शांग्रिला संवादातील आपल्या भाषणात मोदींनी इंडो-पॅसिफिकचे भौगोलिक संदर्भ पुनर्परिभाषित केले होते. तसेच नोव्हेंबर २०१७ नंतर मोदींनी पश्चिमेकडील मुक्त देशांच्या नेत्यांशी भेट घेतलेली नाही, हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. भारताने आता व्यावहारिक विचार केला पाहिजे आणि चीनशी स्पर्धा करण्याच्या हेतूला दूर सारून, आपला दृष्टिकोन बदलायला हवा. स्वतःच्या विकासासाठी काय करता येईल यावर लक्ष केंद्रीत करायला हवे.
भारतासाठी सर्वात मोठी समस्या आपले शेजारील देशच आहेत. ” त्यांच्यासोबतच्या राजनैतिक धोरणास आकार देण्यात आपल्याला अद्यापही यश मिळालेले नाही.” असे विधान नुकतेच ऍशली टेलिसने केले. आपली आर्थिक किंवा लष्करी शक्ती आपल्या शेजारील देशांच्या परराष्ट्र धोरणावर निर्णायक प्रभाव पाडू शकत नाही. चीनचा आशियात आर्थिक आणि लष्करी शक्ती म्हणून उदय झाल्याने ही परिस्थिती आणखी तीव्र झाली आहे.
आपल्याला पाकिस्तानशी संबंध निर्माण करताना आलेले अपयश हे अगदी स्पष्ट आहे. भारताने प्रथम पाकिस्तानला गाजर दाखवून भुलवण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्याला अपयश आले तेव्हा भारताने छडीचा वापर केला. यामुळे निवडणुकीत बराच फायदा झाला असला तरी इस्लामाबादचे वर्तन बदलण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी त्याचा फायदा झाला का, या प्रश्नाचे उत्तर अजून सापडलेले नाही. पाकिस्तानमुळे भारताला आधीच खूप खर्च करावा लागतो, विशेषतः पाकिस्तानचे भारताविरुद्ध चाललेल्या अघोषित युद्धाचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी खर्च केला जातो. त्यांच्या शत्रुत्वामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, हे वास्तव नाकारता येत नाही.
पाकिस्तानने भारतासोबत सामान्य व्यापार आणि दळणवळण करण्यास नकार दिला आहे. इतकेच नाही तर ते आपल्यात आणि मध्य आशिया व पश्चिम आशियामध्ये अडथळा म्हणून उभे आहेत. त्यामुळे त्या प्रदेशाशी रेल्वे, रस्ता किंवा पाइपलाइन मार्गाने व्यापार प्रस्थापित करण्यास आपण अक्षम आहोत. भारत या परिस्थितीवर मात करण्यासाठी चबाहार प्रकल्पाची आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडॉरची (INSTC) मदत घेत आहे.
परंतु आता जेव्हा आपण काही प्रमाणात यश आपल्या पदरी पडेल अशी चिन्हे आहेत, तेव्हा अमेरिकेने इराणवर प्रतिबंध आणले आहेत. सध्या भारताकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचा प्रभाव नाही की आपण अमेरिकेला आव्हान देऊ शकू. त्यामुळे जोपर्यंत इराण आणि अमेरिका यांच्यातील ही समस्या संपत नाही तोपर्यंत कोणीही चबाहार आणि आयएनएसटीसीमध्ये पैसे गुंतवण्यास तयार होणार नाही.
जीमेल (Gmail) मधील ‘स्नुज’बटणबद्दल तुम्हाला माहिती असेल. या ‘स्नूज’बटणाचा वापर करून आपण एखादा संदेश आता लपवून आपल्या आवश्यकतेनुसार तो पुन्हा आणू शकतो. हे एक असे साधन आहे ज्याचा वापर करून आपण एखाद्या समस्येचा सामना तेव्हा करू शकतो जेव्हा आपण त्या समस्येचा सामना करण्यास सक्षम असू. अशाप्रकारची यंत्रणा इराण, अफगाणिस्थान आणि मध्य आशिया सारखे काही भाग हाताळताना आवश्यक आहे.
हे प्रदेश भारताचे जवळची राष्ट्र आहेत हे खरे, परंतु काही काळ आपली यूरेशिअन महत्वाकांक्षा बाजूला ठेवणे नवी दिल्लीसाठी मोलाचे ठरेल. भारताने आपल्या मर्यादीत स्त्रोतांचा वापर आपल्या शेजारी राष्ट्रांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी करावा आणि बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील समुदायाने सादर केलेल्या संधीकडे लक्ष द्यावे. तसेच पाकिस्तानशी व्यवहार करण्याचा मार्ग शोधणे सध्या आवश्यक आहे. पाकिस्तान हा अशा शेजारी देश आहे की त्यासाठी ‘स्नूज’बटन वापरता येणार नाही आणि तसे करणे हुशारी ठरणार नाही. तसेच सर्व सुरळीत होईपर्यंत आपण शांत बसू शकतो, असाही गैरसमज बाळगू नये.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Manoj Joshi is a Distinguished Fellow at the ORF. He has been a journalist specialising on national and international politics and is a commentator and ...
Read More +