-
CENTRES
Progammes & Centres
Location
मोबाइल-कॉम्प्युटरच्या अतिरेकी वापरामुळे मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासावर नकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
स्मार्टफोन, टीव्ही, गेमिंग कन्सोल, टॅब्लेट आणि कॉम्पुटरवर एखादी व्यक्ती जेवढा वेळ घालवते त्याला स्क्रीन टाइम असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीचा स्क्रीन टाइम जितका जास्त तितके त्याचे आयुष्य अधिक बैठे होते. व्यक्तीची शारिरीक हालचाल कमी झाली की त्याचा थेट परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर होतो आणि तिचे झोपेचे चक्र बिघडते. कोविड १९ महामारीच्या काळात लहान मुलांसह मोठ्या माणसांचेही आयुष्य स्मार्टफोन तसेच कॉम्प्युटर स्क्रीन भोवती फिरत आहे. निर्बंधांमुळे घरात अडकलेल्या मुलांसाठी यातून बाहेर पडण्याची तूर्तास तरी काही चिन्हे नाहीत.
ही महामारी येण्याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने ५ वर्षांच्या खालील मुलांच्या शारिरीक हालचाली, बैठी जीवनशैली आणि झोपेचे चक्र याबाबत काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार एक वर्षाच्या आतील बालकांना स्क्रीनसमोर बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर ५ वर्षांखालील मुलांना पालकांनी फक्त एक तासाहून कमी काळ कॉम्प्युटर, मोबाइल, टीव्ही आधी वापरण्यास द्यावा असे म्हटले आहे. म्हणजेच ह्या मुलांचा स्क्रीन टाइम हा १ तासापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
वेगवान डिजिटलायझेशनमुळे अधिकाधिक लोक कित्येक तास ऑनलाइन वाचनाला पसंती देत आहेत. अर्थात यात मुलांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे मुलांना फोन आणि डिजिटल उपकरणांपासून दूर ठेवणे कठीण जात आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या दृष्टीवर होत आहे. वाढत्या स्क्रीन टाइममुळे येणारे अंधत्व, लठ्ठपणा, मानसिक ताण यांसारख्या आरोग्याच्या समस्या तसेच शाळेत अभ्यासातील मुलांची खराब कामगिरी आणि वर्तनातील बदल यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
लहान मुलांमधील स्क्रीन एक्सपोजर ट्रेंडच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की २ वर्षाखालील मुलांच्या स्क्रीन टाइममध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे तर टीव्ही पाहण्याचेही प्रमाण मुलांमध्ये वाढते आहे. यामुळे मुलांच्या शारिरीक हालचालींमध्ये घट झाली आहे. कामामुळे व्यस्त जीवन आणि प्रतिकूल हवामानामुळे पालकांकडे असलेला वेळेचा अभाव अशी अनेक कारणे शिशु वर्गातील मुलांच्या पालकांनी या अभ्यासामध्ये नमूद केली आहेत.
अभ्यासाचे साधन म्हणून डिजिटल साधनांचे संभाव्य फायदे आणि शारिरीक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम यांचे संतुलन साधण्यासाठीचा सुयोग्य स्क्रीन टाइम समजून घेणे आव्हानात्मक आहे. स्क्रीन टाइमचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. डिजिटल साधने हे जसे ज्ञान आणि माहितीचे भांडार आहे तसेच सर्जनशील विचार आणि सामाजिक कौशल्याला मारक ठरत आहेत.
डिजिटल माध्यमांचा वापर करताना पालकांनीही मुलांसोबत असण्याची गरज द अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सने नोंदवली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पालकांचा सहभाग असल्यास मुलांच्या अभ्यासात आणि विकासामध्ये फायदा होतो. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर होणारा नकारात्मक परिणाम त्यासोबत मुले या वेळात काय पाहतात यावर रोख लावता येऊ शकतो. याचा फायदा असा की माहितीचा योग्य वापर करून मुलांना विचार करण्यासाठी तसेच नवीन संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. लहान आणि किशोरवयीन मुलांना पुरेशी झोप, शारिरीक हालचाल आणि डिजिटल माध्यमांपासून आराम अत्यंत गरजेचा आहे असे संशोधनातून दिसून आले आहे.
डिजिटल स्क्रीनचा मोठा परिणाम चीनी शिशु वर्गातील मुलांवर दिसून आला आहे. उदाहरणार्थ मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासावर नकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. चीनमधील जवळपास ६० टक्के अल्पवयीन मुले ऑनलाइन गेम्स खेळतात. याच पार्श्वभूमीवर सध्या मुलांच्या ऑनलाइन गेमिंगवर लावण्यात आलेले निर्बंध मुलांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
फक्त लहान मुलांमध्येच नव्हे तर किशोरवयीन मुलांमध्येही वाढता स्क्रीन टाइम हे एक मोठे चिंतेचे कारण आहे. किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढते आहे. स्क्रीन टाइम कमी करून पुरेशी झोप वाढवून जुळ्या मुलांमधील वर्तनाचे निरीक्षण एका अभ्यासात करण्यात आले. या निरीक्षणाअंती मुलांमधील आवेगपूर्ण आणि भावनावश वर्तनात घट झालेली दिसून आली.
मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे आणि त्यांनी भरपूर झोप घेणे हे त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे याचा पुनरोच्चार लॅन्सेटनेही केला आहे. एक तास किंवा त्याहून अधिक शारिरीक कसरत किंवा व्यायाम, ८ ते १० तासांची शांत झोप प्रतिदिन दोन तासांहूनही कमी स्क्रिनटाइम याचा सकारात्मक प्रभाव मुलांच्या मानसिक आरोग्य आणि आकलनावर दिसून येतो.
प्रत्येक व्यक्तीची इतरांशी संवाद साधण्याची पद्धत आणि शिक्षण पद्धती यात दीर्घकालीन आणि आमुलाग्र बदल झाला आहे. कोविड १९ महामारीच्या काळात संपूर्ण जगातील शाळा निर्बंधांमुळे बंद करण्यात आल्या आहेत. यावर उपाय म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ई लर्निंगला पसंती देण्यात आली आहे यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. युनिसेफच्या म्हणण्यानुसार, जागतिक स्तरावर १६८ दशलक्षाहून अधिक मुलांच्या शाळा एका वर्षासाठी पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे लाखो मुले आभासी शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. सगळ्या शाळा आता ऑनलाइन असल्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे.
महामारीच्या काळामध्ये भारतात स्क्रीन टाइममध्ये तब्बल २५ टक्क्यांची वाढ झाली आहे (म्हणजेच कोविड आधी ४.९ तास आता महामारीच्या काळात ६.९ तास इतके नोंदवण्यात आले आहेत). नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या अभ्यासानुसार सध्याच्या घडीला फक्त १० टक्के मुलं स्मार्टफोनचा वापर अभ्यास आणि शाळेसाठी करत आहेत तर तब्बल ५३ टक्के मुलं चॅटिंग आणि समाज माध्यमांवर वेळ घालवत आहेत.
या अहवालात पालकांनी स्वतःचा स्क्रीन टाइम करून मुलांसमोर आदर्श ठेवला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद वाढवला पाहिजे असे नमूद करण्यात आले आहे. कोविड १९ लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या मानसिक आरोग्यावर ३० भारतीय शहरांमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये असे दिसून आले की जवळपास ६५ टक्के मुले ही डिव्हाईस अॅडिक्ट झाली आहेत. तात्काळ मुलांनी हा वापर थांबवणे गरजेचे आहे असे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
इंडियन सायकीआट्रीक सोसायटीने मुलांनी किती वेळ स्क्रीनसमोर घालवावा यावर काही शिफारसी केल्या आहेत. त्यानुसार २ वर्षाखालील आणि २ ते ५ वर्षांमधील मुलांसाठी पालकांचे मार्गदर्शन आणि पालकांसोबत संवाद अत्यंत गरजेचा आहे. मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी डिजिटल मीडियाचा वापर दीर्घकाळासाठी हानिकारक आहे. लॉकडाऊन मध्ये बंद झालेल्या शाळा, ऑनलाइन माध्यमांचा वाढता वापर आणि वाढता स्क्रीन टाइम यामुळे मुलांचा आपल्या वयाच्या मुलांशी संवाद कमी झाला आहे. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या स्क्रीन टाइम वापराबाबत काही शिफारशी केल्या आहेत.
ऑनलाइन अभ्यासाचा वेळ, कुटुंबासोबतचा संवाद, इंटरनेट सर्फिंग या सर्व पैलूंचा एकत्रित अभ्यास करायला हवा. डिजिटल माध्यमांचा वापर ज्ञान आणि माहिती मिळण्यासाठी कसा करावा याबाबत मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यास मुले स्वतःच स्वतःच्या वर्तनाचे नियमन करू शकतील. पालकांचा या सर्व प्रक्रियेतील सहभाग मुलांसाठी अधिक फायद्याचा आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हा दृष्टीकोन धोरणकर्त्यांनी विचारात घ्यायला हवा आणि त्यायोगे स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि सर्वात शेवटची पण महत्वाची बाब शिक्षकांनी सर्जनशीलता आणि कल्पकता यांचा योग्य वापर करून मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवायला हवे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr. Shoba Suri is a Senior Fellow with ORFs Health Initiative. Shoba is a nutritionist with experience in community and clinical research. She has worked on nutrition, ...
Read More +