Author : Manoj Joshi

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 28, 2025 Updated 0 Hours ago

अमेरिकेची लष्करी मदत थांबवल्यामुळे युक्रेनची स्थिती आणखी कमकुवत झाली आहे. यामुळे रशियाला प्रोत्साहन मिळाल्याने कीव्हच्या युद्ध टिकवण्याच्या क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांचा पुरवठा खंडित होण्याचा धोका, अमेरिकेच्या धोरणाचा परिणाम कसा होईल?

Image Source: Getty

    युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर संघर्ष सुरूच आहे, आणि शांतता योजनेच्या भवितव्यावर मोठे प्रश्न कायम आहेत. खरोखरच, दोन्ही पक्षांच्या समाधानासाठी त्यावर काम केले जाऊ शकते का? राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर त्यांच्या अटींवर युद्ध संपवण्यासाठी दबाव टाकण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने युक्रेनचा शस्त्रास्त्र पुरवठा आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आधी स्थगित केली आणि नंतर पुन्हा सुरू केली. युक्रेन आता अमेरिकेच्या ३० दिवसांच्या युद्धबंदी योजनेला पाठिंबा देत आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दूरध्वनीवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतरही व्लादिमीर पुतिन सहमती दाखवत नाहीत.

    युक्रेनमधील शस्त्रास्त्र आणि गुप्तचर यंत्रणांनी तात्पुरत्या स्थगितीमुळे कीव्ह आणि युरोपमध्ये चिंता निर्माण झाली आहे. युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनला मिळणारी मदत दुप्पट करण्याचे आश्वासन दिले असले तरी, वास्तव असे आहे की रशियाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण करणे, एचआयएमएआर-गाइडेड मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टमसाठी लक्ष्य निश्चित करणे, तसेच रशियावरील लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी लक्ष्य निश्चित करणे यामध्ये अमेरिकन यंत्रणेची महत्त्वाची भूमिका आहे. युक्रेनसाठी मोठा प्रश्न हा आहे – अमेरिकेच्या मदतीशिवाय ते युद्ध टिकवू शकतात का? आणि तसे असल्यास, किती काळ?

    युक्रेनने आता अमेरिकेच्या ३० दिवसांच्या युद्धबंदी योजनेला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतरही व्लादिमीर पुतिन यावर सहमती दर्शवत नाहीत.

    सध्या युक्रेनच्या २० टक्के भागावर रशियन सैन्याचा ताबा आहे. गेल्या वर्षभरापासून रशियन सैन्य मोठ्या संख्येच्या आधारे आणि जीवितहानी स्वीकारण्याच्या तयारीसह सातत्याने दबाव कायम ठेवत आहे. मात्र, त्यांना फारसे यश मिळालेले नाही.

    इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरने असा अंदाज व्यक्त केला आहे की, 2024 मध्ये अनेक आक्रमणे करून, रशियन सैन्य "युक्रेनच्या लाईन तोडण्यात किंवा त्यांना फार पुढे नेण्यात अपयशी ठरले आहे." ऑगस्ट 2024 मध्ये, रशियन सैन्य पूर्व युक्रेनमधील पोक्रोवोस्क शहराच्या अवघ्या 10 किमी अंतरावर असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, सहा महिने उलटूनही त्यांनी अद्याप शहरात प्रवेश केलेला नाही. तरीही, युक्रेनियन नागरिकांनी हे शहर मोठ्या प्रमाणात रिकामे केले आहे. गेल्या वर्षी युक्रेनने रशियातील कुर्स्क जिल्ह्याचा काही भाग ताब्यात घेतला होता, परंतु आता त्यांना या भागातून हाकलून देण्यात आले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या तात्पुरत्या स्थगितीचा परिणाम कुर्स्कमध्ये रशियन हल्ल्यांच्या यशावर झाला असावा.

    वास्तव असे आहे की, रशियन सैन्याने युक्रेनचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे आणि युक्रेनियन सैन्याकडे हे प्रदेश परत मिळवण्यासाठी आवश्यक संसाधनांची कमतरता आहे. पूर्वीचे अमेरिकन मित्रराष्ट्र आता स्पष्टपणे सांगत आहेत की, युक्रेनला त्याचा संपूर्ण गमावलेला भूभाग परत मिळवणे अवघड होईल. दरम्यान, रशियन रॉकेट आणि ड्रोन हल्ल्यांमुळे युक्रेनच्या शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यांमुळे वीजपुरवठा यंत्रणा, शाळा, घरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होत आहेत.

    रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत कीव्हवर दबाव आणण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. नाटो सदस्यत्वाचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यापासून ते युक्रेनला आपल्या भूभागाचे काही नुकसान स्वीकारावे लागेल, यासह अनेक बाबींमध्ये अमेरिका मॉस्कोसाठी हा करार अधिक अनुकूल बनवत आहे. लष्करी मदत आणि गुप्तचर यंत्रणेचे पाठबळ थांबविल्याने युक्रेनची स्थिती आणखी कमकुवत झाली आहे. यामुळे रशियाला युक्रेनवरील लष्करी दबाव वाढवण्याचे प्रोत्साहन मिळू शकते, असा अंदाज ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’ने व्यक्त केला आहे. आतापर्यंत, रशियाने शांतता वाटाघाटींमध्ये कोणतीही सवलत देण्यास नकार दिला असून, कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यास आणि वाटाघाटीद्वारे शस्त्रसंधीची शक्यता मान्य करण्यास असमर्थता दर्शवली आहे. अमेरिका-युक्रेन शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी आणि त्यानंतर चर्चेची शक्यता निर्माण करण्यासाठी अमेरिका राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर दबाव टाकू शकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    रशियन रॉकेट आणि ड्रोन युक्रेनच्या शहरांमध्ये दहशत निर्माण करत आहेत आणि वीज ग्रीड, शाळा, घरे तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विध्वंस करत आहेत.

    त्यामुळे सध्या तरी वर्षानुवर्षे नव्हे, तर आगामी काही महिनेचं हे युद्ध सुरू राहण्याची शक्यता विचारात घ्यावी लागेल. अमेरिका ही युक्रेनला ६४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची लष्करी मदत आणि जवळजवळ तितक्याच प्रमाणात बिगर-लष्करी मदत देणारा सर्वात मोठा देणगीदार आहे. जर युक्रेन-रशिया आघाडीवर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर युक्रेनला मदत करण्यासाठी तसेच स्वतःची संरक्षण यंत्रणा विकसित करण्यासाठी युरोपियन देश मोठी धावपळ करत आहेत.

    अमेरिकेच्या मदतीचा मोठा भाग युक्रेनसाठी अमेरिकन लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी देशांतर्गत खर्च केला गेला आहे. मात्र, तोफगोळे, बख्तरबंद वाहने, अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह ही अत्याधुनिक शस्त्रे युक्रेनच्या युद्धप्रयत्नांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. एकत्रितपणे पाहता, युरोपियन देशांनी अमेरिकेपेक्षा अधिक लष्करी मदत (६६ अब्ज अमेरिकन डॉलर्स) पुरवली आहे, परंतु ती विविध देशांकडून आल्यामुळे आणि वेगवेगळ्या प्रणालींचा समावेश असल्याने ती कमी प्रभावी ठरू शकते. मात्र, अमेरिकेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युद्धाचा महत्त्वाचा टप्पा बदलला आहे. उदाहरणार्थ, पॅट्रियट ही एकमेव प्रणाली आहे जी रशियन क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या नष्ट करू शकते.

    इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज, लंडनचे महासंचालक बॅस्टियन गिगेरिच यांच्या मते, २०२४ मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट सामरिक फायदा मिळालेला नाही. तसेच, रशियन सैन्याला केवळ किरकोळ क्षेत्र फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि उपकरणांचे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांच्या मते, रशिया आता युद्धसामग्री आणि शस्त्रास्त्रांसाठी उत्तर कोरिया आणि इराणवर अवलंबून आहे. रशियन संरक्षण उद्योगाने लवचिकता दाखवली असली तरीही, भविष्यातील युद्धातील नुकसानभरपाई करणे त्यांच्यासाठी कठीण ठरणार आहे. IISS चा अंदाज आहे की, २०२६ च्या सुरुवातीपर्यंत रशियाकडे मोठ्या आक्रमणासाठी पुरेसे मुख्य रणगाडे शिल्लक राहणार नाहीत.

    युक्रेनची स्थिती देखील काहीशी कमजोर आहे, कारण तो रशियाच्या तुलनेत आकाराने लहान आहे. तरीही, तो युद्ध हरत नाही. २०२३ पासून युक्रेनच्या भूभागावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात रशियाने जोरदार आक्रमक कारवाया केल्या, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. अंदाजानुसार, या युद्धात आतापर्यंत १,५०,००० ते २,००,००० रशियन सैनिकांनी प्राण गमावले आहेत, आणि त्यातील निम्म्याहून अधिक संख्या केवळ २०२४ मध्ये मृत्यूमुखी पडली आहे.

    युक्रेनच्या रणनीतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या "फास्ट इनोव्हेशन सायकलवर" आधारित राहणे आणि रशियावर हल्ला करण्यासाठी विविध श्रेणींतील यूएव्ही विकसित करणे. जरी युक्रेनने कठोर बचावात्मक लढाई लढली असली, तरी गमावलेले प्रदेश पुन्हा मिळवण्यात त्याला फारसा यश मिळालेले नाही. अमेरिकेच्या मदतीत झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, युरोपने आपल्या लष्करी मदतीत लक्षणीय वाढ केली नाही, तर युक्रेनची परिस्थिती अधिक कठीण होऊ शकते. तरीही, जमिनीवरील सद्यस्थिती पाहता, युक्रेनचा बचाव पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता कमी आहे.

    युक्रेनच्या नवनिर्मितीने, विशेषतः ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, युद्धाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला आहे. सुरुवातीच्या काळात तोफखाना, क्षेपणास्त्रे, रणगाडे आणि खंदक युद्धाचे प्राबल्य होते. आजही हे सर्व घटक युद्धातील महत्त्वाचा भाग आहेत, परंतु सध्याच्या युद्धात बहुतांश हत्याकांडे ड्रोनच्या माध्यमातून केली जात आहेत. दोन्ही पक्ष ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत, मात्र येथे रशियाला संख्याबळाचा फायदा आहे, तर युक्रेन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. युक्रेनच्या रोबोटिक सागरी जहाजांनी रशियन नौदलाला युक्रेनजवळील समुद्रातून परत फिरायला भाग पाडले आहे. तसेच, युक्रेनच्या भूभागावर हल्ला करणाऱ्या ड्रोननेही आता आपले ठोस अस्तित्व निर्माण केले आहे. डिसेंबरमध्ये, खार्कीव आघाडीवर, युक्रेनियन सैन्याने रायफल्स आणि मशीनगनने सुसज्ज सुमारे ५० मानवरहित जमिनीवरील वाहनांचा वापर करून एक संपूर्ण "ऑल-ड्रोन" हल्ला केला.

    तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की ड्रोन इतर प्रणालींसोबत, जसे की तोफखाना आणि रणगाडे हे संयोजनात वापरल्यास अधिक प्रभावी ठरतात. युक्रेनने आपल्या तुलनेने कमी संख्याबळ असलेल्या पायदळाची कमतरता भरून काढण्यासाठी ड्रोन युनिट्सचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. युक्रेनने सांगितले आहे की, 2024 मध्ये त्यांनी 10 लाखांहून अधिक एफपीव्ही ड्रोन तयार केले आहेत आणि यावर्षी त्यापेक्षा तिप्पट ड्रोन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या ड्रोनमध्ये कमी पल्ल्याच्या एफपीव्ही ड्रोनपासून मोठ्या क्षमतेच्या इराणी बनावटीच्या शाहेद ड्रोनपर्यंत तसेच युक्रेनच्या मोहाजर 6 किंवा टीयू-141 सारख्या अत्याधुनिक ड्रोनचा समावेश आहे. याचा उपयोग शत्रूवर हेरगिरी करण्यासाठी तसेच ग्रेनेड, मोर्टार राऊंड, क्लस्टर युद्धसामग्री आणि अगदी युद्धभूमीवर थर्मोबॅरिक चार्जेस टाकण्यासाठी केला जात आहे.

    युक्रेनच्या रोबोटिक सागरी जहाजांनी रशियन नौदलाला युक्रेन जवळील समुद्रातून हाकलून लावले आहे, तसेच युक्रेनच्या जमिनीवर हल्ला करणारे ड्रोनही आता प्रभावीपणे कार्यरत आहेत.

    युक्रेनियन लोकांचा आणखी एक मोठी नवकल्पना म्हणजे डेल्टा युद्धभूमी व्यवस्थापन प्रणाली. ही प्रणाली उपग्रह, ड्रोन, रडार, ग्राउंड सेन्सर आणि फ्रंटलाइन अहवाल यांसारख्या विविध स्रोतांमधील डेटा एकाच इंटरफेसमध्ये एकत्रित करते आणि युक्रेनच्या सैन्याला रिअल-टाइम परिस्थितीची जाणीव करून देते. रिपोर्टनुसार, युक्रेनचा ॲव्हेंजर्स एआय प्लॅटफॉर्म डेल्टा सह समक्रमित आहे. या प्रणालीत अमेरिकेच्या पॅलांटीर एआय कंपनीचे अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे.

    लढाईतील आणखी एक सतत बदलणारे क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक युद्ध. या क्षेत्रात रशियन सैन्य मजबूत असून, त्यांचा सामना करण्यासाठी युक्रेनियन सैन्य वेगवान नाविन्यपूर्णतेवर अवलंबून आहे. बहुतेक ड्रोनना उड्डाणासाठी इलेक्ट्रॉनिक सिग्नलची आवश्यकता असते, त्यामुळे जीपीएस सिस्टम, लष्करी दळणवळण, नेव्हिगेशन, रडार आणि पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांना अक्षम करण्यासाठी युद्धभूमीवर जॅमिंग सिस्टम मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्या आहेत. जीपीएस जॅमिंगमुळे अमेरिकन जीपीएस-मार्गदर्शित शेल्सची प्रभावीता घटली आहे. या जॅमिंगला बायपास करण्यासाठी युक्रेनियन सैन्याने टोही ड्रोनवर लेझर डिझायनर जोडला आहे. तसेच, जॅमिंगवर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या ड्रोन आणि रोबोट्ससाठी "फ्रिक्वेन्सी होपिंग" प्रणाली विकसित केली आहे. याशिवाय, एआयद्वारे निर्देशित देखरेख ड्रोन विकसित करण्यात येत आहेत. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी त्यांच्या कमी पल्ल्याच्या ड्रोनना फायबर-ऑप्टिक केबल्सशी जोडण्याची रणनीती स्वीकारली असून, ही पद्धत लक्षणीय प्रभावी ठरत आहे.

    अमेरिकेची कायमस्वरूपी मदत बंद झाल्यास, युक्रेनच्या सैन्याला पराभूत करण्याची रशियाची क्षमता नक्कीच वाढेल, यात शंका नाही. सध्याच्या परिस्थितीत, अमेरिकेचा रशियाकडे असलेला कल त्यांना स्वतःच्या अटींशिवाय इतर कोणत्याही अटींवर शांतता प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करण्याऐवजी, त्यांची तयारी अधिकच कमी करण्याची शक्यता आहे. तथापि, अमेरिकेच्या पाठिंब्याने असो वा त्याशिवाय, युक्रेनची लढण्याची इच्छाशक्ती कायम दृढ राहिली आहे. शिवाय, युक्रेनच्या वेगाने विकसित होणाऱ्या ड्रोन सैन्याच्या वाढीमुळे आणि तोफखाना व मोर्टार दारुगोळा उत्पादनाच्या वाढीमुळे, रशियाचा कोणताही निश्चित विजय अशक्य ठरणार आहे.


    मनोज जोशी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे प्रतिष्ठित फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.