Author : Ramanath Jha

Expert Speak Urban Futures
Published on Jun 13, 2024 Updated 0 Hours ago

पाळत ठेवण्याच्या तंत्रज्ञानाचे सकारात्मक परिणाम दिसत असले तरी, त्यामुळे गोपनीयतेवर होणाऱ्या आक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शहरांमधील पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे गोपनीयतेला धोका?

तंत्रज्ञानाची आपल्या दैनंदिन जीवनातील व्यापक उपस्थिती अधिकाधिक वाढत आहे. असेच एक क्षेत्र म्हणजे घरात, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी क्लोज-सर्किट टेलिव्हिजनद्वारे (सीसीटीव्ही) पाळत ठेवणे. परिणामी, शहराच्या मोकळ्या जागेच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञान हे उत्तरोत्तर केंद्रस्थान प्राप्त करत आहे. मात्र, त्याचबरोबर सतत पाळत ठेवून नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनावर तीव्र आक्रमण आणि तपासणी केल्याने लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि खासगी अवकाशावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

उलटपक्षी, सतत पाळत ठेवून नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनावर तीव्र आक्रमण आणि तपासणी केल्याने लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि खासगी अवकाशावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

खासगी जागांवर पाळत ठेवणारे कॅमेरे वापरण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढत  आहे. अधिकाधिक घरांमध्ये सुरक्षा कॅमेरे बसवले जात आहेत. जागतिक स्तरावर, १२२.१ दशलक्ष कुटुंबे घरात सुरक्षा कॅमेरे वापरत होती, २०२७ सालापर्यंत ही संख्या १८०.७ दशलक्ष कुटुंबांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. अशा कुटुंबांत, जिथे प्रत्येक सदस्य कामाकरता बाहेर पडतो, त्यावेळी सुरक्षा कॅमेरे कौटुंबिक मालमत्तेची सुरक्षितता राखण्यासाठी सतत दक्ष असतात. घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्यास अलार्म सिस्टीमसह सुसज्ज असलेली सीसीटीव्ही व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने आणि लक्षणीयरीत्या घराची सुरक्षा वाढवतात. शिवाय, ‘लाइव्ह फीड ॲप’ पालकांना घरकाम करणाऱ्यांवर- विशेषत: जेव्हा लहान मूल घरी असते, तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची मुभा देते. खरोखरच, घराच्या सतत संपर्कात राहिल्याने नोकरी करणाऱ्या जोडप्यांना मनःशांती लाभते.

जगभरातील घरे, व्यवसाय आणि कार्यालये पाळत ठेवण्याकरता व सुरक्षिततेकरता अशा तांत्रिक सहाय्यावर अधिकाधिक अवलंबून आहेत. व्यवसायाच्या आवारात बसवलेली एक स्मार्ट रचना केलेली सीसीटीव्ही प्रणाली वास्तवात घडत असलेल्या घडामोडींचे तात्काळ सर्वसमावेशक कव्हरेज उपलब्ध करून देऊ शकते, ज्यात जगभरात कोठूनही प्रवेश करता येतो. वर्धित सुरक्षा, कमी झालेला विमा खर्च आणि गैरकृत्ये घडल्यास आवश्यकतेनुसार ठरू शकणारे दर्जेदार पुरावे याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर देखरेख ठेवता येत असल्याने संस्था, रेस्टॉरंट्स आणि कॉल सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढली आहे. असे निरीक्षण आरोग्य सुविधा आणि शाळांमध्येही वापरले गेले आहे. अशा देखरेखीद्वारे सुधारित कामगिरीसह सकारात्मक परिणाम प्राप्त झाले आहेत.

रस्त्यावर पाळत ठेवण्याकरता होणारा पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांचा वापर अधिक लक्षणीय आहे आणि या विषयाची चर्चा या लेखात करण्यात आली आहे. स्ट्रीट कॅमेरा हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे स्वयंचलित डेटा संकलनासाठी धोरणात्मकरित्या रस्त्यावर बसवण्यात आलेले आहेत. रस्त्यांवरील कॅमेरे प्रतिबंधक म्हणून काम करतात, यांत शंका नाही. ते संभाव्य चुकीच्या कृत्यांना कायदेशीर सीमारेषा ओलांडण्यापासून परावृत्त करतात आणि गुन्हेगारांना बेकायदेशीर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहण्याची सूचना देतात. ते सार्वजनिक जागा अधिक सुरक्षित करतात. शिवाय, ते रस्त्यावरील घटनांची नोंद करतात, गरज भासल्यास त्याचे पुनरावलोकन केले जाऊ शकते. दृक् पुराव्याची नोंद हा पुराव्याचा सर्वोत्तम प्रकार असल्याने, गुन्ह्यांची उकल करण्यात आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्यात त्याची मोठी मदत होते. सीसीटीव्ही केवळ गुन्हा केलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यात मदत करते, असे नाही तर साक्षीदारांची ओळख पटवण्यातही सीसीटीव्ही तितकाच उपयुक्त ठरतो. गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी कॅमेऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या संदर्भात केलेल्या अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, सीसीटीव्ही ६५ टक्के प्रकरणांत अत्यंत उपयुक्त ठरतो आणि अंमली पदार्थ, शस्त्रे बाळगणे आणि फसवणूक वगळता सर्व गुन्ह्यांकरता उपयुक्त आहे. घटनांचे प्रत्यक्षदर्शी पक्षपाती असू शकतात आणि नेहमी सत्य समोर आणू शकत नाहीत, व्हिडिओ रेकॉर्ड कधीकधी अस्पष्ट असू शकते, परंतु ते कधीही पक्षपाती नसते. त्यामुळे अशा पुराव्याची विश्वासार्हता सामान्यतः संशयापलीकडे असते.

सीसीटीव्ही केवळ गुन्हा केलेल्या व्यक्तींना ओळखण्यात मदत करतो असे नाही, तर साक्षीदारांची ओळख पटवण्यातही तितकाच उपयुक्त ठरतो. गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी कॅमेऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या संदर्भात केलेल्या अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला सीसीटीव्ही ६५ टक्के प्रकरणांत अत्यंत उपयुक्त ठरतो आणि अंमली पदार्थ, शस्त्रे बाळगणे आणि फसवणूक वगळता सर्व गुन्ह्यांकरता उपयोगी आहे.

कॅमेरे २४ तास कर्तव्य बजावत असल्याने, लोक रस्त्यावरून चालत असताना, रस्त्यावर कितीही एकटे असले किंवा गर्दी असली तरीही तिथे वावरणाऱ्यांना सुरक्षिततेचे मानसिक बळ पुरवतात. त्यांची २४ तास उपस्थिती आणि सतर्कता याची कितीही उत्तम मानवी उपस्थितीशी तुलना करता येणार नाही. एक अतिरिक्त फायदा असा की, सततच्या उपस्थिती व्यतिरिक्त, कॅमेरे सर्वाधिक आवश्यकता असलेल्या ठिकाणी ठेवता येतात आणि सर्वोत्तम दृश्य प्रदान करण्यासाठी इष्टतम कोन साधता येतो. या व्यतिरिक्त, मध्यवर्ती स्थानावरून त्यांचे निरीक्षण केले जाऊ शकते. अनेक शहरे आधीच कृत्रिम बुद्धिमत्तेने सक्षम असे वाहतूक कॅमेरे वापरत आहेत, जे वास्तवात घडणाऱ्या घडामोडींचा डेटा कॅप्चर करून आणि त्यावर प्रक्रिया करून रहदारी व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण सहाय्य प्रदान करतात. ते गाडीने लाल दिवा चुकवणे, वेगात गाडी चालवणे, थांबण्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष करणे आणि धोकादायक लेन कटिंग यांसारख्या रहदारीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचेही काम करतात.

विमानतळ, रेल्वे स्थानके, स्टेडियम आणि मोठ्या मेळाव्यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी आणि प्रवेशावर नियंत्रण राखण्याकरता रस्त्यावर पाळत ठेवणारे कॅमेरे तितकेच आवश्यक आहेत. कॅमेरे तात्काळ सुधारात्मक उपाय योजण्याची मुभा देतात आणि चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यास मदत करतात. रहदारी आणि वाहतुकीत, ते प्रवाशांच्या प्रवाहाचे निरीक्षण करू शकतात आणि गर्दी कमी करण्यासाठी व सुरळीत वाहतूक प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी निर्णय घेणाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा डेटा प्रदान करू शकतात. चंदीगडमधील एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, रस्त्यावरील कॅमेऱ्यांमुळे दंड आकारणीच्या रकमेत वाढ झाली आहे. त्यांच्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय (कामात चालढकल करणारे) किंवा सक्रिय (पैसे कमावणाऱ्या) गैरप्रकारांचीही नोंद होते. एकंदरीत, अशी दूरस्थ देखरेख करणारे तंत्रज्ञान हे प्रत्यक्षात मानवी कृतीला पर्याय ठरत नसला तरी ते एक उत्तम पूरक साधन असू शकते.

व्यापक मार्ग आणि व्यवसायावर पाळत ठेवणे हा दिनक्रम बनत असताना, लोकांच्या जीवनपद्धतीला धोका निर्माण करण्याबाबत यामुळे प्रश्न उद्भवतात. व्यापक दृक् पाळत ठेवल्याने मत व्यक्त करण्याच्या अधिकारावर आणि वावरावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. भीती व्यक्त केली जाते की, सीसीटीव्ही निगराणीमुळे व्यक्तींची आर्थिक माहितीवर पाळत ठेवण्याची क्षमता निर्माण होते. बहुधा व्यक्तींच्या स्पष्ट संमतीशिवाय अनेक डेटाबेसमध्ये ती शेअर केली जाते आणि संग्रहित केली जाते आणि त्या माहितीचा दुरुपयोग करण्यास आमंत्रण मिळते. सीसीटीव्हीची परिणामकारकता सुनिश्चित करणे आणि नागरिकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे यात योग्य संतुलन साधण्याबद्दलही राजकीय वादविवाद सुरू आहेत.

जसे पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान त्याच्या प्रसारात अधिक स्मार्ट आणि व्यापक होत आहे, त्यासोबत गोपनीयतेच्या आक्रमणाशी संबंधित प्रश्न अधिक सुस्पष्ट झाले आहेत. सार्वजनिक जागांवर पाळत ठेवल्याने खासगी अवकाशावर मोठी गदा आली आहे, यात शंका नाही. एखादी व्यक्ती रस्त्यावर उतरते तेव्हापासून ती घरी परत येईपर्यंत तीव्यक्ती अक्षरशः नजरेखाली असते. एखाद्या बागेत मित्रासोबत गप्पा मारत असो, मेळाव्यात विनोद शेअर करत असो किंवा एखाद्या विषयांवर मत व्यक्त करत असो- या घटना आणि कथन सार्वजनिक मालमत्ता ठरण्याची दाट शक्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उपकरणांच्या किमतीत होणारी नाट्यमय घट यांच्या संयोगाने, आज छोट्या आकाराची, हाय-डेफिनिशन उपकरणे बसवणे शक्य आहे, जी पूर्णपणे लपवून ठेवलेली असतात आणि जवळजवळ कोठेही संगणकावर रेकॉर्ड आणि प्रसारित करू शकतात. अशा पाळत ठेवण्याच्या ‘चिलिंग इफेक्ट’चा (कायदेशीर मंजुरीच्या धोक्याद्वारे नैसर्गिक आणि कायदेशीर अधिकारांच्या कायदेशीर वापरास होणारा प्रतिबंध) परिणाम मानवी वर्तणुकीतील बदलांमध्ये होऊ शकतो, जिथे लोक व्यक्तिगत सुरक्षेसाठी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य किंवा शांततापूर्ण निषेध यांसारख्या मूलभूत अधिकारांचा वापर टाळण्याचा निर्णय घेऊ शकतात. शिवाय, अशी चिंता आहे की, ठेवण्यात येणारी सार्वजनिक पाळत सामाजिक भेदभाव कायम ठेवण्यास मदत करू शकते. जेव्हा अल्गोरिदमला पक्षपाती डेटा दिला जातो, तेव्हा त्यामुळे डेटामधील पूर्वग्रहांना बळकटी मिळते आणि कायद्याच्या अंमलबजावणीत अनावश्यक विसंगती वाढते.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उपकरणांच्या किमतीत होणारी नाट्यमय घट यांच्या संयोगाने, आज छोट्या आकाराची हाय-डेफिनिशन उपकरणे बसवणे शक्य झाले आहे, जी पूर्णपणे लपवलेली असतात आणि जवळपास कोठेही संगणकावर रेकॉर्ड आणि प्रसारित करू शकतात.

अशा प्रकारे, सार्वजनिक जागांच्या निगराणीतून उपयुक्त सकारात्मक बाबी समोर येत असताना, सार्वजनिक प्राधिकरणांना मोठ्या प्रमाणात खासगी डेटा उपलब्ध होतो आणि अशा डेटाचे लहान भाग कधी व्यक्ती अथवा गटांच्या छळासाठी वापरले जाणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांच्या वापरात आणि व्यवस्थेच्या प्रशासनात गोपनीयतेसंबंधात असलेली तफावत सरकारने ओळखली आहे, ज्यामुळे अवांछित गोपनीयता भंग होऊ शकतो. म्हणून, अशा खासगी डेटाचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी योग्य कायदे आवश्यक आहेत. सार्वजनिक अधिकाऱ्यांनी असा डेटा हाताळण्यासाठी सोपवलेल्या सरकारी आणि सुरक्षा संस्थांसाठी धोरण मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यांच्या उल्लंघनासाठी योग्य दंड आकारणे आवश्यक आहे. दंडाच्या संदर्भात एक प्रमुख सूचना अशी आहे की, वैयक्तिक डेटाच्या गैरवापरामुळे चुकीच्या व्यक्तींना भरपाई द्यावी लागेल. यापुढे आवश्यक नसलेला वैयक्तिक डेटा त्वरित नष्ट करायला हवा. काही लोकशाही देश गोपनीयता कायद्यांच्या विस्तारात पुढे जात असताना, लहान व्यवसाय आणि वैयक्तिक उद्योग हे सर्वाधिक अनियंत्रित असल्याचे दिसून येते. हे सुस्पष्ट आहे की, तांत्रिक प्रगती, सार्वजनिक पाळत ठेवणे आणि गोपनीयतेचे कायदे काही काळाकरता मांजर-उंदराचा खेळ सुरू ठेवतील.


रामनाथ झा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिष्ठित फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Ramanath Jha

Ramanath Jha

Dr. Ramanath Jha is Distinguished Fellow at Observer Research Foundation, Mumbai. He works on urbanisation — urban sustainability, urban governance and urban planning. Dr. Jha belongs ...

Read More +