Author : Malvika Mudgal

Expert Speak Health Express
Published on Apr 18, 2025 Updated 0 Hours ago

मासिक पाळीतील समतेकडे जाणारा मार्ग हा सांस्कृतिक संदर्भ आणि टिकाऊ नवकल्पनांमध्ये समतोल साधणाऱ्या उपाययोजनांवर अवलंबून आहे.

भारतातील मासिकपाळी स्वच्छतेत सुधारणा: पिरियड पॉवर्टी विरुद्धची लढाई

Image Source: Getty

    हा जागतिक आरोग्य दिन 2025: निरोगी सुरुवात, आशावादी भविष्य या लेख मालिकेचा एक भाग आहे.


    मासिक पाळीच्या व्यवस्थापनाचा अर्थ केवळ रक्तस्राव व पाळीवर नियंत्रण ठेवणे असा नसून, तो किशोरवयीन मुली आणि महिलांच्या एकूण आरोग्य, सशक्तता आणि कल्याणाच्या अत्यंत महत्त्वाच्या व मूलभूत पैलूंशी संबंधित आहे. संपूर्ण जगात कोणत्याही वेळेस सुमारे ३० कोटी महिलांना मासिक पाळी चालू असते. तरीही, आजही ५० कोटींहून अधिक महिलांना आवश्यक मासिक पाळी साहित्य, स्वच्छतागृहे आणि सुरक्षित व आरोग्यदायी मासिक पाळी व्यवस्थापनासाठी आवश्यक मूलभूत माहिती मिळत नाही. भारतामध्ये ही समस्या आणखीनचं तीव्र आहे, जिथे ७१ टक्के किशोरवयीन मुलींना त्यांची पहिली पाळी येईपर्यंत मासिक पाळीविषयी काहीही माहिती नसते.

    भारतातील सध्याची स्थिती

    नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (NFHS-5) अभ्यासणाऱ्या संशोधकांना असे आढळून आले आहे की 76.15 टक्के महिला मासिक पाळी दरम्यान केवळ स्वच्छतेची साधनेच वापरतात. शहरी आणि ग्रामीण भागात यामध्ये स्पष्ट तफावत दिसून येते — शहरी भागात 89.37 टक्के महिला, तर ग्रामीण भागात केवळ 72.32 टक्के महिला स्वच्छ साधनांचा म्हणजेच हायजेनिक पिरियड प्रॉडक्ट्सचा वापर करतात. राजस्थानमध्ये, 76 टक्के तरुणी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात, तर 44 टक्के कपड्यांवर अवलंबून असतात आणि 11 टक्के स्थानिक स्तरावर तयार करण्यात आलेल्या नॅपकिन्सचा वापर करतात. मात्र, काहीप्रमाणात प्रगतीही झाली आहे — मागील राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणात ज्या महिला स्वच्छ मासिक पाळीची साधने (हायजेनिक प्रॉडक्ट) वापरत होत्या त्यांचे प्रमाण 55 टक्के होते, जे आता वाढून 84 टक्क्यांवर पोहोचले आहे. तरीही, शहरी-ग्रामीण दरी कायम आहे — ग्रामीण भागात केवळ 82 टक्के महिला मासिक पाळी दरम्यान स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतींचा वापर करतात, तर शहरी भागात हा आकडा 92 टक्के आहे. हे आकडे मासिक पाळी संदर्भातील संसाधने व शिक्षण यामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी लक्ष केंद्रित केलेल्या उपाययोजनांची तातडीने गरज असल्याचे अधोरेखित करतात.

    राजस्थानमधील धोलपूर जिल्हा मासिक पाळीच्या आरोग्यविषयक मुद्द्यांचा एकूण आरोग्य व विकासाच्या निर्देशकांशी असलेला संबंध दर्शवतो. दिल्लीपासून 300 किलोमीटर आणि आग्र्यापासून केवळ 60 किलोमीटर अंतरावर असूनही, NITI आयोगाने (भारत सरकारचे प्रमुख सार्वजनिक धोरण संस्थान) धोलपूरला देशातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळखले आहे. धोलपूरला लैंगिक विषमतेचाही मोठा सामना करावा लागत आहे, जिथे लिंग गुणोत्तर 1,000 पुरुषांमागे केवळ 846 स्त्रिया एवढे आहे, जे की राष्ट्रीय सरासरी 940 च्या खूपच खाली आहे.

    शहरी-ग्रामीण दरी कायम आहे — ग्रामीण भागात केवळ 82 टक्के महिला मासिक पाळी दरम्यान स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतींचा वापर करतात, तर शहरी भागात हा आकडा 92 टक्के आहे

    धोलपूरमध्ये प्रजननक्षम वयातील 30 लाखांहून अधिक महिला राहतात आणि त्यांना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. 69 टक्क्यांहून अधिक महिलांना आणि 64 टक्के गरोदर महिलांना अ‍ॅनिमिया (रक्तक्षय) आहे, जो कुपोषण आणि मासिक पाळीतील विकारांमुळे आणखीन तीव्र होतो. मासिक पाळीचे आरोग्य सुधारणे म्हणजे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून — ते आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक सशक्ततेशी संबंधित आहे. त्यामुळे समग्र आणि बहुआयामी आरोग्यविषयक हस्तक्षेप आवश्यक आहेत.

    धोरणातील त्रुटी दूर करणे आणि सामुदायिक सहभागाचा मागोवा

    मासिक पाळीचे आरोग्य हा अजूनही एक गूढ आणि कलंकित विषय आहे, जो महिलांची शिक्षण, रोजगार आणि आरोग्यसेवा यापर्यंतची पोहोच मर्यादित करतो. भारत सरकारने प्रजननक्षम माता, बाल आरोग्य आणि किशोरवयीन (RMNCH+A) धोरणांतर्गत मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छता हे एक प्राधान्यपूर्ण क्षेत्र म्हणून निश्चित केले आहे. या अंतर्गत त्यांनी व्यापक आरोग्य जनजागृती आणि किशोरवयीन शिक्षण यावर लक्ष केंद्रित करणारे महत्त्वाचे उपक्रम सुरू केले आहेत, जे सेवा आणि उत्पादने पुरवण्यावर भर देतात. तसेच “स्वच्छ भारत: स्वच्छ विद्यालय” (स्वच्छ भारत: स्वच्छ शाळा) यांसारख्या मोहीमेमुळे शाळांमध्ये कार्यरत आणि नीटनेटकी WASH (पाणी, स्वच्छता आणि स्वच्छतागृहे) सुविधा पुरवण्याची खात्री केली जाते.

    राजस्थान राज्य सरकारने 2021 मध्ये उडाण योजना सुरू केली आहे, जी शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत किशोरवयीन मुली आणि महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देते. मोफत मासिक पाळी किट्स उपलब्ध करून देणे हे निश्चितच स्तुत्य आहे, परंतु या कार्यक्रमांची खरी प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष समुदाय सहभाग, शिक्षण आणि वर्तनात्मक बदलाच्या माध्यमातून विद्यमान माहितीचे अडथळे दूर करणे अत्यावश्यक आहे.

    मोफत मासिक पाळी किट्स उपलब्ध करून देणे हे निश्चितच स्तुत्य आहे, परंतु या कार्यक्रमांची खरी प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष समुदाय सहभाग, शिक्षण आणि वर्तनात्मक बदलाच्या माध्यमातून विद्यमान माहितीचे अडथळे दूर करणे अत्यावश्यक आहे.

    धोलपूरच्या ग्रामीण भागातील महिलांसोबत थेट काम करताना एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे वर्तनात्मक प्रवृत्ती उत्पादनाच्या स्वीकारावर प्रभाव टाकते. अनेक महिला सिंगल-यूज पॅड्सपेक्षा कापड वापरणे अधिक पसंत करतात, कारण त्यात त्यांना अधिक आरामदायक आणि परिचित वाटते. याव्यतिरिक्त, या योजनांद्वारे प्रामुख्याने सिंगल-यूज मासिक पाळी पॅड्स पुरवले जातात, ज्यामुळे पर्यावरणीय कचऱ्यात मोठ्या प्रमाणात भर पडते — ज्याचा अंदाज दरवर्षी सुमारे 1,13,000 टन इतका आहे. एखाद्या स्त्रीला तिच्या आयुष्यात साधारणतः 459 वेळा मासिक पाळी येते, त्यामुळे वापरलेल्या उत्पादनांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे, आणि ती अनेक वेळा उघड्यावर, पाण्याच्या स्रोतांमध्ये फेकली जातात किंवा असुरक्षित पद्धतीने पुरली किंवा जाळली जातात.

    शाश्वत बदलासाठी संस्कृतीसन्मानित दृष्टिकोन  

    मासिक पाळीविषयक आरोग्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जनजागृतीचा उपलब्धता आणि वर्तनात्मक पैलू यामध्ये समतोल साधणारी सर्वसमावेशक पद्धत आवश्यक आहे. संशोधनातून स्पष्ट होते की, मासिक पाळीच्या आरोग्य व स्वच्छतेवर विशेष लक्ष न दिल्यास 2030 पर्यंत लैंगिक व प्रजनन आरोग्यसेवा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG) गाठणे कठीण ठरेल.

    संस्कृतीसन्मानित दृष्टिकोन हा समुदायाच्या सहभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण अगदी वापरलेली भाषा किंवा संज्ञाही सहभागावर परिणाम करू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा धोलपूरच्या गावांमध्ये आणि शाळांमध्ये मासिक पाळी स्वच्छता प्रकल्प सुरू करण्यात आला, तेव्हा त्याला “प्रोजेक्ट लाली” असे नाव देण्यात आले. हिंदीत “लाल” या शब्दाचा अर्थ रक्ताचे प्रतीक असलेल्या लाल रंगाशी संबंधित आहे, आणि “लाली” हा मुलगी किंवा लेकीसाठी प्रेमाने वापरला जाणारा शब्द आहे. हे नाव सांस्कृतिकदृष्ट्या लोकांना आपलेसे वाटले आणि वैद्यकीय भाषेचा वापर टाळल्यामुळे संवादात अडथळा येण्याची शक्यता कमी झाली. त्याचप्रमाणे, शाळांमध्ये वापरण्यात येणारे “पीरियड का पीरियड” (पीरियडसाठी एक पीरियड किंवा तास) असे शब्दप्रयोग आणि “पीरियड हमारी शक्ति है” (मासिक पाळी ही आमची ताकद आहे) यासारख्या प्रेरणादायी घोषणा संवाद अधिक सहज करतात. याउलट “किशोरावस्था” किंवा “मासिक धर्म” यासारख्या तांत्रिक संज्ञा लोकांना दूर वाटू शकतात. असा दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे स्वीकारार्हता वाढते, अडथळे दूर होतात आणि मोकळ्या संवादाला चालना मिळते.

    कापडावर आधारित, पुन्हा वापरता येण्याजोगे मासिक पाळी पॅड्स सध्याच्या सवयींशी सुसंगत आहेत, तसेच स्वच्छता आणि टिकाऊपणाही वाढवतात आणि हळूहळू स्वीकार करण्यास मदत करतात.

    शाळा आणि समुदायांमध्ये गटाधारित, पुराव्यावर आधारित सल्ला सत्रांच्या माध्यमातून माहितीतील अंतर भरून काढता येऊ शकते. यामुळे जनजागृती वाढवता येते, गैरसमज दूर करता येतात आणि महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक निर्णयांबाबत सक्षम करता येते. अनेक पिढ्यांपासून कापड वापरण्याची सवय असलेल्या महिलांना सिंगल-यूज पॅड्सकडे वळणे कठीण वाटू शकते; हे विशेषतः 29 वर्षांवरील महिलांमध्ये अधिक आढळते. कापडावर आधारित, पुन्हा वापरता येण्याजोगे मासिक पाळी पॅड्स सध्याच्या सवयींशी सुसंगत आहेत, तसेच स्वच्छता आणि टिकाऊपणाही वाढवतात आणि हळूहळू स्वीकार करण्यास मदत करतात. हे पॅड्स टाकावू उत्पादनांच्या विल्हेवाटीचा प्रश्नही सोडवतात, जो ग्रामीण भागात एक गंभीर मुद्दा आहे, जिथे प्लास्टिक पॅड्स अनेकदा शेतांमध्ये किंवा पाण्याच्या स्रोतांमध्ये फेकले जातात आणि त्यामुळे पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

    धुवून पुन्हा वापरता येणारे मासिक पाळी पॅड्स टाकावू उत्पादनांच्या विल्हेवाटीची समस्या दूर करतात. मर्यादित संसाधन असलेल्या समुदायांमध्ये उत्पादने निवडताना शाश्वतता हा प्रमुख घटक नसतो, तरीही हे पुन्हा वापरता येणारे पॅड्स कचरा मोठ्या प्रमाणात कमी करतात आणि मासिक पाळी स्वच्छतेशी संबंधित कार्बन फूटप्रिंटही घटवतात, ज्याचा फायदा वैयक्तिक आरोग्यासह पर्यावरणालाही होतो.

    मासिक पाळीविषयक आरोग्य उपक्रमांना पुढे नेण्यासाठी पुरुषांचा सहभाग देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. जरी महिलाच बहुतेकवेळा सल्ला सत्रांचे नेतृत्व करत असल्या, तरी पुरुष समुदायाला एकत्र करण्यासाठी, चर्चेसाठी सुरक्षित जागा सुनिश्चित करण्यासाठी आणि लॉजिस्टिकसाठी मदत करू शकतात. ग्रामीण भागात पुरुष हे सत्रांचे आयोजन करण्यात मदत करतात आणि सत्रानंतर महिलांना अंधार पडण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी घेतात. धोरणांच्या पातळीवर, पुरुष निर्णयकर्त्यांना – मग ते शासनात, आरोग्य प्रशासनात किंवा स्थानिक नेतृत्वात असोत – संवेदनशील करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून मासिक पाळीचे आरोग्य व्यापक आरोग्य आणि विकास धोरणांमध्ये समाविष्ट करता येईल.

    स्त्रियांच्या आरोग्यातील दरी भरून काढणे  

    मॅकिन्सेच्या अहवालानुसार, महिलांना पुरुषांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के अधिक काळ अस्वास्थ्यदायी (पुअर हेल्थ) अवस्थेत घालवावा लागतो. महिलांच्या आरोग्यावर दर १ अमेरिकी डॉलरसाठी केलेली गुंतवणूक ३ डॉलर्सच्या आर्थिक वाढीचा लाभ देऊ शकते. ही दरी भरून काढल्यास २०४० पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत दरवर्षी १ अब्ज अमेरिकी डॉलर्सची भर पडू शकते.

    जेव्हा हस्तक्षेप विद्यमान प्रथा सन्मानाने स्वीकारतात, पुराव्यावर आधारित शिक्षण देतात आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देतात, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल शक्य होतो.

    मासिक पाळी स्वच्छतेतील शाश्वत पद्धतींवर लक्ष केंद्रित केल्यास आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या तिन्ही क्षेत्रांमध्ये तिप्पट लाभ मिळतो. प्रथम, सुधारित मासिक पाळी स्वच्छतेमुळे संसर्ग कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते. द्वितीय, पुन्हा वापरता येणारे पॅड्स कचरा कमी करतात आणि कार्बन फूटप्रिंटही घटवतात. आणि तृतीय, मासिक पाळी आरोग्यात गुंतवणूक केल्याने महिलांचा आर्थिक सहभाग आणि उत्पादकता वाढते.

    मासिक पाळीतील समतेकडे वाटचाल करताना संस्कृतीचा संदर्भ आणि शाश्वत नवकल्पना यांच्यात समतोल राखणाऱ्या उपाययोजना आवश्यक आहेत. जेव्हा हस्तक्षेप विद्यमान प्रथा सन्मानाने स्वीकारतात, पुराव्यावर आधारित शिक्षण देतात आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देतात, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल शक्य होतो. लज्जा ऐवजी आत्मसन्मान आणि अडथळ्यांऐवजी संधी उपलब्ध करून देताना आपण असा बदल अनुभवतो आहोत, जो केवळ वैयक्तिक आरोग्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण समुदायाच्या कल्याण आणि आर्थिक स्थैर्यापर्यंत पोहोचतो.


    मालविका मुद्गल या एक सामाजिक उद्योजिका आणि माजी कॉर्पोरेट कर्मचारी असून, राजस्थानमधील धोलपूर जिल्ह्यातील चंबळ घाटांमध्ये स्थानिक पातळीवरील विकासासाठी कार्यरत आहेत.    

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

    Author

    Malvika Mudgal

    Malvika Mudgal

    Malvika Mudgal is a social entrepreneur, ex-corporate worker, driving grassroots development in the Chambal Ghaats of Rajasthan, in Dholpur district. Malvika’s background has been in ...

    Read More +