Author : Del Titus Bawuah

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 24, 2025 Updated 1 Hours ago

आफ्रिकेचे डिजिटल परिवर्तन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, आफ्रिकेला आपले डिजिटल शक्तीकेंद्र बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी अत्यंत गरजेची आहे.

उपसहारा आफ्रिकेत डिजिटल कल्पकतेला चालना देण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीची गरज

Image Source: Getty

उपसहारा आफ्रिका (सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील प्रदेश) हे डिजिटल कल्पकता आणि तंत्रज्ञान उद्योजकतेचे एक जागतिक केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. या प्रदेशातील वेगवान स्टार्टअप परिसंस्था या फिन्टेक, हेल्थटेक, अ‍ॅग्रीटेक, एडटेक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाढते क्रिप्टो व ब्लॉकचेन क्षेत्र यांसारख्या उद्योगांमध्ये परिवर्तन घडवित आहेत. कल्पकतेच्या या लाटेला तरुण पिढी, मोबाइलचा वाढता प्रसार आणि डिजिटल वित्तीय उपायांमुळे अधिक बळ येत आहे. मात्र, अपुऱ्या पायाभूत सुविधा, भांडवलाची मर्यादित उपलब्धता, नियामक अनिश्चितता आणि कौशल्यांमधील तफावत यांसारख्या आव्हानांमुळे विकासात अडथळा निर्माण होत आहे. डिजिटल कल्पकता पूर्ण क्षमतेने समोर येण्यासाठी आणि एका मजबूत, सर्वसमावेशक डिजिटल अर्थव्यवस्थेची आफ्रिकेत वृद्धी होण्यासाठी धोरणात्मक सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहकार्य गरजेचे आहे.  

डिजिटल कल्पकता पूर्ण क्षमतेने समोर येण्यासाठी आणि एका मजबूत, सर्वसमावेशक डिजिटल अर्थव्यवस्थेची आफ्रिकेत वृद्धी होण्यासाठी धोरणात्मक सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहकार्य गरजेचे आहे.

उपसहारा आफ्रिकेच्या तंत्रज्ञान परिसंस्थेच्या विकासाचा मार्ग

सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी उद्योजक तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याने या प्रदेशात डिजिटल परिवर्तनाला चालना मिळाली आहे. ‘ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाइल कम्युनिकेशन्स असोसिएशन’ (जीएसएमए) या संस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रदेशातील ३० कोटींपेक्षाही अधिक नागरिक आता मोबाइल इंटरनेट वापरतात. ही संख्या लक्षणीयरीत्या वाढू शकते. हे विस्तारणारे डिजिटल अवकाश विविध क्षेत्रांमधील कल्पकतेला उत्तेजन देत आहे :

१.    वित्तीय समावेशनात क्रांती घडवून आणणारे फिन्टेक: आफ्रिकेतील डिजिटल क्रांतीमध्ये फिन्टेक स्टार्टअप्स आघाडीवर आहेत. ती बँकिंग सुविधा नसलेल्या आणि बँकिंग सुविधा कमी प्रमाणात असलेल्यांना वित्तीय सेवा पुरवण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करतात. फ्लटरवेव्ह, चिपर कॅश आणि एम-पेसा यांसारख्या कंपन्या या डिजिटल पेमेंट सोल्युशन्स, मोबाइल वॉलेट्स आणि क्रॉस बॉर्डर रेमिटन्स सेवा देऊन पारंपरिक बँकिंग मॉडेल्समध्ये अडथळा आणत आहेत. २०२२ मध्ये फिन्टेकने आफ्रिकी स्टार्टअपसाठी सर्व व्हेंचर कॅपिटल गुंतवणुकीपैकी ३९ टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक मिळवली. यामुळे या क्षेत्राच्या वाढीवर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे दिसून आले. 

२.    सामाजिक दरी भरून काढण्याचे काम करणाऱ्या हेल्थटेक आणि एडटेक टेलीमेडिसीन, मोबाइल डायग्नोस्टिक्स आणि आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठांच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवण्यात क्रांती घडवत आहेत. उदाहरणार्थ, हेलियम हेल्थ आणि ५४ जीन वैद्यकीय रेकॉर्ड सिस्टिम आणि जिनोमिक संशोधनात परिवर्तन घडवत आहेत. त्याचप्रमाणे यूलेसन आणि एनेझा एज्युकेशन यांसारखी एडटेक व्यासपीठे परवडणाऱ्या डिजिटल शिक्षण साधनांसह सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देत आहेत. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर शिक्षकांना प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या साधनांची सुसज्जता ठेवून एडटेक शिक्षणात क्रांती घडवत आहेत.

३.    कृषी तंत्रज्ञान उत्पादकता आणि अन्न सुरक्षेत वाढ करीत आहे. शेती हा बहुतेक आफ्रिकी अर्थव्यवस्थांचा कणा आहे. ट्विगा फुड्स आणि फार्मक्रॉडी यांसारखे ॲग्रीटेक स्टार्टअप्स उत्पादकता वाढवण्यासाठी, पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी आणि लहान शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेची उपलब्धता वाढवण्यासाठी डिजिटल व्यासपीठे, ब्लॉकचेन आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर करीत आहे. 

यूलेसन आणि एनेझा एज्युकेशन यांसारखी एडटेक व्यासपीठे परवडणाऱ्या डिजिटल शिक्षण साधनांसह सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देत आहेत.

क्रिप्टो उद्योगाचा आफ्रिकेत उदय

उपसहारा आफ्रिकेतील सर्वांत गतिशील व वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र म्हणजे, क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन उद्योग. आर्थिक अस्थिरता, चलनाचे अवमूल्यन आणि रेमिटन्स (परदेशात पैसे पाठवणे) सोल्युशन्सच्या मागणीत मोठी वाढ यामुळे जागतिक क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यात आफ्रिका आघाडीवर आहे. चेनॲनालिसिस या ब्लॉकचेन ॲनालिसिस कंपनीच्या मतानुसार, जुलै २०२० ते जून २०२१ या कालावधीत आफ्रिकेतील क्रिप्टोकरन्सी बाजारपेठ १२०० टक्क्यांहून अधिक वाढली. ती जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी क्रिप्टो अर्थव्यवस्था बनली आहे. ही अवाढव्य वाढ संपूर्ण खंडातील आर्थिक परिसंस्थांना आकार देत आहे. प्रमुख क्षेत्रांमध्ये नाविन्य आणण्यासाठी क्रिप्टोकरन्सी प्रेरणा देत आहे : -

१.    आर्थिक समावेशन आणि रेमिटन्ससाठी क्रिप्टोचा उपाय

पारंपरिक बँकिंग प्रणालींना क्रिप्टोकरन्सीकडून पर्याय निर्माण केला जात आहे. हे पर्याय बऱ्याच आफ्रिकी देशांमध्ये अनेकदा उपलब्ध होत नाहीत किंवा विश्वासार्ह नसतात. यलो कार्ड आणि बिटपेसासारख्या स्टार्टअप्समुळे पारंपरिक ‘मनी ट्रान्स्फर’ सेवांपेक्षा कमी शुल्कात आणि जलद व्यवहार करून परदेशातील भरणा आणि रेमिटन्स शक्य होतो.

२.    डेफी आणि संपत्ती निर्मितीची संधी

संपत्ती निर्मिती आणि गुंतवणुकीसाठी विकेंद्रित वित्त (डेफी) लोकप्रिय होत आहे. बांबू आणि चिपर कॅश यांच्यासारख्या व्यासपीठांमुळे आफ्रिकी नागरिकांना जागतिक बाजारपेठेत गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे, विकेंद्रित कर्ज देणारी व्यासपीठे पारंपरिक वित्तीय प्रणालींच्या बाहेर असलेल्या लोकांना कर्जही उपलब्ध करून देत आहे.

३.    टोकनायझेशन ॲंड डिजिटल ॲसेट इनोव्हेशन

टोकनायझेशन आणि रिअल इस्टेट व कमोडिटीसह डिजिटल मालमत्तेचे टोकनीकरण हे एक व्यवहार्य गुंतवणूक मार्ग म्हणून उदयास येत आहे. नायजेरियन स्टार्टअप ‘एक्सएंड फिनान्स’सारखे प्रकल्प विकेंद्रित क्रेडिट युनियन तयार करीत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना चलनाच्या अवमूल्यनापासून बचाव होण्यासाठी स्थिर क्रिप्टोकरन्सीमध्ये बचत करणे शक्य होते.

४.    नियामक अनिश्चितता आणि आव्हाने

वाढ वेगाने होत असली, तरी आफ्रिकेतील क्रिप्टो उद्योगासमोर नियामक अनिश्चितता महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करतात. परस्परविरोधी नियामक चौकटी आणि बँकिंग निर्बंधांमुळे कल्पकता व अवलंब रोखले गेले आहेत. उदाहरणार्थ, नायजेरिया आणि केनियाने क्रिप्टो व्यवहारांवर बँकिंग निर्बंध लादले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेसारखे अन्य देश अधिक प्रगतीशील नियामक दृष्टिकोन विकसित करीत आहेत.

बांबू आणि चिपर कॅश यांच्यासारख्या व्यासपीठांमुळे आफ्रिकी नागरिकांना जागतिक बाजारपेठेत गुंतवणूक करणे शक्य झाले आहे.

वाढीला अडथळा आव्हानांचा

उपसहारा आफ्रिकेतील तंत्रज्ञान परिसंस्था खूप आशादायक असली, तरी अनेक अडथळ्यांचा विचार करावा लागणार आहे:

१.    भांडवलाची उपलब्धता

निधी मिळवण्यासाठी स्टार्टअप्सना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. २०२२ मध्ये आफ्रिकी टेक स्टार्टअप्समध्ये व्हेंचर कॅपिटल गुंतवणूक पाच अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक झाली असली, तरी यांतील बहुतेक निधी केवळ काही देशांनाच प्राप्त होतो. त्यामुळे विकसित होणाऱ्या अनेक बाजारपेठांना निधीची आवश्यकता भासत नाही.

२.    पायाभूत सुविधांची कमतरता

ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, डेटा सेंटर आणि पेमेंट गेटवे यांच्यासह विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधांच्या अभावामुळे संपूर्ण प्रदेशातील डिजिटल व्यवसायांच्या व्याप्तीमध्ये अडथळा आणतो.

३.    नियामक आणि धोरणात्मक अडचणी

परस्परविरोधी नियामक चौकटी, नोकरशाहीचा ढिसाळ कारभार आणि सहायक धोरणांचा अभाव यांमुळे विशेषतः विकसनशील क्रिप्टो क्षेत्रातील स्टार्टअप व गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण होते.

४.    कौशल्यांमधील तफावत आणि गुणवत्ता जोपासणे

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बलॉकचेन तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये गुणवत्ता जोपासण्याची कमतरता असल्यामुळे डिजिटल कौशल्यांमधील तफावत वाढत आहे. त्याचप्रमाणे आफ्रिकी स्टार्टअपना गुणवत्ता टिकवून ठेवण्यामध्ये येत असलेल्या आव्हानांशी सामना करावा लागत आहे. कारण कुशल कर्मचारी बरेचदा बाहेरील देशात मोठ्या संधीच्या शोधात असतात.

सार्वजनिक-खासगी सहकार्याचे मार्ग

वर सांगितलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि आफ्रिकेतील डिजिटल अर्थव्यवस्थेची क्षमता पुढे आणण्यासाठी धोरणात्मक सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रभावी सहकार्याचे काही मार्ग असे:

१.    डिजिटल पायाभूत सुविधेतील गुंतवणूक

सरकार आणि खासगी क्षेत्रातील घटक इंटरनेट कनेक्टिव्हिटी, डेटा सेंटर आणि ब्लॉकचेन नोड्ससह डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सहकार्य करू शकतात. कर सवलती, अनुदाने आणि नियामक मदत यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रोत्साहनपर योजनांमुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढू शकते.

२.    वित्त व गुंतवणूक व्यासपीठे

सार्वजनिक-खासगी संयुक्त उपक्रमांतून सार्वजनिक अनुदान आणि खासगी उद्योग भांडवल एकत्रित करून मिश्र वित्त मॉडेलच्या माध्यमातून निधीची तफावत भरून काढू शकतात. या व्यतिरिक्त सरकारे ब्लॉकचेन आणि डेफी क्षेत्रांत जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी क्रिप्टोस्नेही नियमांना प्रोत्साहन देऊ शकतात.     

३.    धोरणांमधील एकात्मकता आणि नियामक सुधारणा

सार्वजनिक-खासगी संवाद नियामक सुधारणांना चालना देतात आणि स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. डिजिटल पेमेंट नियमांचे मानकीकरण करणे, क्रिप्टोकरन्सीसंबंधीच्या व्यवहारांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून देणे आणि डेटा गोपनीयता कायदे लागू करणे या गोष्टी परदेशी डिजिटल व्यापारासाठी गरजेच्या आहेत.

४.    डिजिटल कौशल्य विकास आणि क्षमता निर्मिती

डिजिटल साक्षरता, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि उद्योजकता कार्यक्रम यांना प्रोत्साहन देऊन सार्वजनिक-खासगी भागीदारीतून कौशल्यामधील तफावत भरून काढता येऊ शकते. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि बायनान्ससारख्या कंपन्यांबरोबरच्या सहकार्यामुळे ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल वित्त क्षेत्रात प्रमाणपत्रे आणि व्यावहारिक प्रशिक्षण मिळू शकते.

५.    कल्पकतेची केंद्रे (इनोव्हेशन हब) आणि क्रिप्टो इनक्युबेटर

सरकार खासगी उद्योगांसमवेत भागीदारी करून कल्पकतेची केंद्रे आणि क्रिप्टो इनक्युबेटर निर्माण करू शकतात. या माध्यमातून मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि व्हेंचर कॅपिटल उपलब्धता मिळू शकते. हे केंद्र ब्लॉकचेन प्रयोग आणि धोरण विकासासाठी वातावरणनिर्मिती करण्याचे काम करू शकते.  

सीमेपलीकडील डिजिटल व्यापारासाठी डिजिटल देयक नियमांचे प्रमाणीकरण करणे, क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे स्थापित करणे आणि डेटा गोपनीयता कायद्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

केस स्टडी: यशस्वी सार्वजनिक-खासगी भागीदारी

१.    ब्लॉकचेन हब, केनिया :

केनिया सरकार आणि खासगी ब्लॉकचेन कंपन्या यांच्या सहकार्याने स्थापन झालेले ब्लॉकचेन हब हे एक कल्पकतेचे केंद्र आहे. हे केंद्र ब्लॉकचेन शिक्षण, संशोधन आणि स्टार्टअप इनक्युबेशनला प्रोत्साहन देते. ते डिजिटल मालमत्तेसाठी नियामक आराखड्यांवर सल्ला देते.

२.    नायजेरियन ‘एसईसी’चे नियामक वातावरण

नायजेरियन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) फिन्टेक आणि क्रिप्टो स्टार्टअपसाठी एक नियामक वातावरण तयार केले. त्यामुळे कंपन्यांना नियंत्रित नियामक वातावरणात कल्पक उत्पादनांची चाचणी घेता आली. हा उपक्रम ग्राहक संरक्षणाची खात्री देऊन कल्पकतेला चालना देतो.

निष्कर्ष

उपसहारा आफ्रिका डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. या क्रांतीत डिजिटल कल्पकता आणि क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याच्या संदर्भाने जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. अर्थात, ही क्षमता दर्शवण्यासाठी पायाभूत सुविधांमधील कमतरता, नियामक अडचणी आणि निधी मिळवण्यातील आव्हानांना तोंड देणारी धोरणात्मक सार्वजनिक-खासगी भागीदारी आवश्यक आहे.   

उपसहारा आफ्रिका डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. या क्रांतीत डिजिटल कल्पकता आणि क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याच्या संदर्भाने जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता आहे.

डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, नियामक स्पष्टतेत वृद्धी करणे, भांडवलाची उपलब्धता वाढवणे आणि डिजिटल गुणवत्ता जोपासणे यांमुळे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना समावेशक डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे प्रगतिशील धोरणे व सहयोगी परिसंस्थांच्या माध्यमातून क्रिप्टो उद्योगांच्या वाढीला मदत केल्याने जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत आफ्रिका आघाडीवर येईल.

आफ्रिकेचे डिजिटल परिवर्तन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, आफ्रिकेला आपले डिजिटल शक्तीकेंद्र बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी अत्यंत गरजेची आहे. ही वेळ कृती करण्याची आहे. उपसहारा आफ्रिकेसाठी समृद्ध डिजिटल आणि क्रिप्टो भविष्य घडवण्यासाठी सामूहिक शक्तींचा लाभ घेण्याची ही वेळ आहे.


डेल टायटस बावूआ हे ब्रिटनमधील फ्युचर फॉरवर्डचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.